जेजुरी, ता. ११ : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळी परिसरात रविवारी (ता. १०) सायंकाळी बांधकाम सुरू असलेली पाच मजली इमारत अचानक एका बाजूला धोकादायकरीत्या झुकल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सोमवारी (ता. ११) सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास ही धोकादायक पाच मजली इमारत सुरक्षितपणे पाडण्यात आली.
जेजुरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खोमणे आळीतील बांधकाम सुरू असलेली इमारत रविवारी सायंकाळी सायंकाळी पाचच्या सुमारास धोकादायकरीत्या झुकली होती. इमारतीचे तळातील कॉलमच्या ठिकाणी आवाज येऊन चिरा पडल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन दल व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली. पोलिसांची तातडीची घटनास्थळी घाव घेऊन परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित स्थलांतर केले तसेच परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली. पोलिस अधिकारी व नगरपालिकेच्या वतीने परिसरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारतीभोवतालची परिसर तत्काळ बंद करण्यात आला. सोमवारी पहाटे पुणे महानगरपालिकेचे इमारत पाडण्याचे कटर्स दाखल झाले. सकाळी आठ वाजता इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आणि क्षणार्धात पाच मजली इमारत खाली कोसळली; मात्र परिसरात कोणतेही नुकसान झाले नाही. प्राथमिक माहितीनुसार, इमारत झुकण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असून नेमके कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाढत्या शहरांमध्ये बांधकाम करताना यापुढील काळात पालिकेला काळजी घ्यावी लागणार आहे. जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे व कर्मचारी वर्गाने इमारत झुकल्यापासून ते इमारत पाडून मलबा हटविण्यापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.
या इमारत अनधिकृतपणे बांधली जात होती. या इमारत मालकास जेजुरी नगरपालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस दिली होती. आणखी अनेक इमारती अनधिकृतपणे बांधण्यात येत असून त्यांनाही पालिकेने नोटिसा दिल्या आहेत. आता या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे.
- चारुदत्त इंगुले, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.