जुन्नर, ता. २ : पंढरपूर पायी वारीत चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांचे कलेच्या माध्यमातून मनोरंजन करण्याबरोबर समाज प्रबोधन करण्याचे काम विकास घोगरे नावाचा अवलिया करत आहे. येणेरे (ता. जुन्नर) येथील नंदनवन संस्थेच्या माध्यमातून घोगरे दिव्यांगासाठी विशेष शिक्षकाचे काम करतात. गेल्या तीन वर्षांपासून अहिल्यानगर मार्गे जाणाऱ्या वैष्णव सेवा भक्त मंडळ दिंडीमध्ये संस्थेतील दिव्यांग मुलांना घेऊन सहभागी होत असतात. नंदनवन प्रकल्पांतर्गत १८ वर्षांपासून घोगरे दिव्यांग मुलांचा सांभाळ करत आहेत. यावर्षी देखील संस्थेतील तीन मुलांना सोबत घेऊन पायी वारीत सहभागी झाले आहेत.
‘‘वारीला येणारे वारकरी आपापल्या परीने देवाला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. काहींना तो मूर्तीत दिसतो तर काहींना माणसात. आम्ही त्यास दिव्यांग बांधवांमध्ये पाहतो. पंढरपूर आषाढी एकादशीच्या सोहळ्याची अनुभूती दिव्यागांना यावी म्हणून संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग पायी वारीचे आयोजन केले जाते,’’ असे घोगरे यांनी सांगितले.
आपल्या जवळील कलेचा उपयोग दिवसभर पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी करत असताना वारीच्या मुक्कामाच्या अथवा विश्रांतीच्या ठिकाणी कला सादर करून दिव्यांग मुलांबाबत जनजागृती करण्याचे काम करत आहेत. पंढरीच्या वाटेवरील थकलेल्या वारकऱ्यांना क्षणभर विसावा देण्यासाठी दिव्यांग कलाकार अभंग, गवळण व भारूडाचे सादरीकरण करतात. या अभिनव उपक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे. नंदनवन संस्थेला कोणतीही शासकीय मदत नाही. समाजातील दानशूर व्यक्तींची मदत होत असते. याचबरोबर स्वावलंबी बनण्यासाठी या मुलांना विविध वस्तूंची निर्मिती करण्यास शिकविले जाते. संस्थेतील विद्यार्थ्यांनी बनवलेली अगरबत्ती खरेदी करून श्रद्धेनुसार विठुरायाच्या चरणी अर्पित करावी व दिव्यांग बांधवांना एक स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करावी, असे आवाहन यावेळी केले जाते. मुलांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचा उपयोग केला जातो, असे घोगरे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.