दत्ता म्हसकर : सकाळ वृत्तसेवा
जुन्नर : शिवनेरीच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या प्राचीन स्वयंभू पंचलिंग मंदिरात श्रावण महिन्यात शंकर महादेवाच्या भक्तीचा निनाद घुमतो.
शिव पुराणात पाच शिवलिंग या पंचमुखी महादेवाची नावे सत्यज्योत, वागदेव, तद्पुरुष, ईशात व अघोर असा उल्लेख केलेला आढळतो.
पंचलिंग मंदिराची रचना सभामंडप, बाराही महिने अखंड पाणी वाहणारे गोमुख, पुष्करिणी, मंदिरासमोर दगडी नंदी व गणपतीचे दर्शन घेऊन पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागतो. येथे कासव, श्री गणेश व लक्ष्मी नारायण मूर्ती आहेत. येथील द्वारातून दगडी पायऱ्या उतरून खोल गर्भगृहात जाता येते. गर्भगृहात एक पिंड दिसत असली तरी या पिंडीच्यामध्ये तळाशी चार दिशांना चार व मध्यभागी एक अशा पाच स्वयंभू पिंडी आहेत.यांना हाताने स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून येतात. मंदिराचे गर्भगृह केबेंलिंग पद्धतीने म्हणजे एकावर एक दगड ठेवून तसेच त्यांच्या वजनाचा समतोल राखत बांधण्यात आले आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात पहाटे पासूनच भाविक दूध, पंचामृत अभिषेक, बेलपत्र, फुले अर्पण करून धूप, कापूर आरतीने पूजाविधी करतात. श्रावण महिन्यात दररोज प्रदक्षिणा व कळसाचे दर्शन घेत व्रतवैकल्ये पूर्ण करण्यास अनेक शिवभक्त येत असतात.
यंदा चार सोमवार यात्रा उत्सव होत असून पहिल्या सोमवारी तांदळाची एक पिंड, दुसऱ्या सोमवारी दोन व तिसऱ्या सोमवारी तीन पिंडी करण्यात आल्या होत्या. शेवटच्या सोमवारी तांदळाच्या पाच पिंडी बनविण्यात येतात. मंदिर परिसर विद्युत रोषणाई व सजावटीने उजळला आहे.
मंदिरात वर्षभरात सोमवती, प्रदोष, त्रिपुरी दीपोत्सव, महाशिवरात्र निमित्ताने विविध धार्मिक उत्सव साजरे होतात.
११ हजार १११ बेलपत्र अर्पण
मंदिराचे व्यवस्थापन आनाजी धोंडजी पाटील बुट्टे ट्रस्ट यांच्याकडे आहे. पिंडीसाठी लागणारा तांदूळ, श्रावण महिन्यात दररोज अभिषेक, प्रत्येक सोमवारी एक हजार १११ व शेवटच्या सोमवारी ११ हजार १११ बेलपत्र, एक सुवर्ण बेलपत्र बुट्टे पाटील कुटुंबीयांकडून अर्पण केले जाते.
जुन्नर : पंचलिंग मंदिर
08989. 08990
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.