महेंद्र शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कडूस, ता. १८ : कडूस (ता.खेड) येथील पशुवैद्यकीय सेवा श्रेणी २ दवाखान्याची सुमारे पन्नास लाख रुपयांच्या सुसज्ज इमारतीचा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. दरवाज्यासमोरच दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. पशुधनाच्या घरपोच सेवेसोबत दवाखान्याच्या परिसर स्वच्छतेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी झगडत आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पशुवैद्यकीय सेवेला बाधा पोचत आहे.
कडूस दवाखान्याचा परिसर २० गुंठे आहे. चोहोबाजूंनी कुंपण आहे. सहायक पशुधन विकास अधिकारी लहू पोखरकर यांनी दवाखान्याच्या परिसरात सुमारे नव्वद फळझाडांची लागवड केली आहे. त्यांनी पदरमोड करून दवाखान्याच्या परिसर स्वछतेसाठी, सुशोभीकरण व सुरक्षेसाठी एका ग्रामस्थाची तजवीज केली आहे. एवढे प्रयत्न करूनही रात्रीच्या वेळी या कुंपणाच्या आतमध्ये येऊन मद्यपी मद्यपान करीत असतात. दवाखान्याकडे ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे पुरेसे लक्ष नसल्याने समाजकंटकांचे फावत आहे.
योग्य सुविधांच्या कमतरतेमुळे पशुपालक क्वचितच पशुधनाच्या औषधोपचारासाठी दवाखान्यात फिरकताना दिसतात. वैद्यकीय अधिकारी पोखरकर हे गावोगावी फिरून गोठ्यावर जाऊन सेवा शुल्क आकारून पशुधनावर उपचार करीत असतात. उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी पोखरकर भेटीसाठी गेले की दवाखाना बंद ठेवावा लागतो.
दृष्टिक्षेपात दवाखाना
दवाखान्यात गोचीड निर्मूलन,
जंत गोळ्या, मिनरल पावडर,
कृत्रिम रेतन, इंजेक्शन,
वेदनाशामक औषधांचा पुरेसा साठा
पशुपालकांच्या समस्या
- मनुष्यबळाअभावी बहुतांश वेळा दवाखाना बंद
- खासगी उपचार घेण्याची वेळ
- एकच अधिकारी असल्याने उपचारासाठी प्रतीक्षा
- बाहेरून औषधे आणावी लागतात
- खासगी औषधांचा खर्च मोठा
- रात्रीच्या वेळी उपचाराबाबत गैरसोय
यांची आहे गरज
- एक्सरे व सोनोग्राफी
- पुरेसा कर्मचारी व अद्ययावत सामग्री
- परिचरपद रिक्त
- पुरेसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग
परिसरातील पशुधन
गाई, म्हैस, बैल........१७२२
शेळ्या........११७
पाळीव प्राणी (कुत्रे, मांजर)........१२७
लसीकरण
लंपी........२६००
लाळ्या खुरकूत........१६५०
घटसर्प........३५०
आंतविषार........७००
राणीखेत........८००
पीपीआर - (फिरत्या शेळ्या मेंढ्या)........६६५
ब्रुसेलोसिस........१५० (मागील वर्षी)
(सध्या कोणतीच लस उपलब्ध नाही)
एप्रिल २५ ते नोव्हेंबर २०२५ची स्थिती
कृत्रिम रेतन
संकरित - १९५
खिलार - १७
गीर - ११
म्हैस - १२
वंध्यत्व निर्मूलन - १४५
खच्चीकरण - ३१
चारा बियाणे - २०० किलो मका
सध्याचे डॉक्टर सहकार्य करतात. परंतु एकच पशुवैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो. त्यामुळे नाइलाजाने बाहेरचे खासगी डॉक्टर बोलवावे लागतात. एक्सरे व सोनोग्राफीची सोय व्हायला पाहिजे. बाहेरील महागड्या औषधांसाठी अधिक खर्च करावा लागते. त्यामुळे दूध उत्पादनात फायदा होत नाही.
- बाळासाहेब धायबर, स्थानिक दूध उत्पादक शेतकरी
दवाखान्याच्या परिसरात मद्यपी लोकांचा त्रास आहे. दवाखान्याच्या आवारात वारंवार मद्यपान व विष्ठा करण्याचे प्रकार घडत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी लक्ष द्यायला पाहिजे. एकटाच असल्याने उपचारासाठी भेटीसाठी बाहेर गेलो की दवाखान्यात आलेल्या पशुधनाला सेवा देण्यात अडचण येत आहे.
- लहू पोखरकर, सहायक पशुधन विकास अधिकारी
02078
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.