पळसदेव, ता. ११ ः पळसदेव (ता. इंदापूर) येथे एसटीच्या सर्व गाड्यांना थांबा असूनही अनेक एसटीचालक येथे बस थांबवत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एसटीला हात दाखवून गाडी थांबविण्याची विनंती करूनही प्रवाशांकडे दुर्लक्ष करत चालक सुसाट निघून जात आहेत. भर उन्हात ताटकळत एसटीची वाट बघणाऱ्या प्रवाशांना डावलणाऱ्या एसटीच्या अशा चालकांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावरील पळसदेव हे एक महत्त्वाचे गाव आहे. येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. पुणे, सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी जाणाऱ्यांबरोबर महामार्गालगतच्या अनेक मोठ्या शहरी गावांमध्ये ये- जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय लगतच्या काही गावांतील प्रवासी पळसदेव येथील थांब्यावर एसटीसाठी येत असतात. परंतु, येथे गेल्या १३ वर्षांपासून प्रवाशांच्या सोईसाठी बसथांब्याचा निवारा उपलब्ध नाही. एसटीचा थांबा मंजूर असून, येथे चालक बस थांबवत नाहीत. यामुळे प्रवाशांना भर उन्हात उभे राहून चटके सहन करावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या नियमानुसार अधिकृत थांब्यावर बस थांबवणे बंधनकारक असतानाही, चालकांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान, वेगाने निघून जाणाऱ्या गाडीचा क्रमांक टिपणे आणि प्रत्येक वेळी लेखी तक्रार करणे ग्रामीण भागातील प्रवाशांना शक्य होत नाही. प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करून चालकांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी ग्रामस्थ प्रवाशांकडून होत आहे.
जेवणासाठी तासभर, प्रवाशांसाठी एक मिनीटही नाही
प्रवाशांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, पळसदेवपासून जवळच्या अंतरावर असलेल्या डाळज गावातील दोन खासगी ढाब्यांवर शेकडो एसटी बस जेवणासाठी थांबतात. तिथे वेळ घालवणाऱ्या चालकांना पळसदेवच्या थांब्यावर प्रवासी घेण्यासाठी मात्र वेळ नसतो. ‘‘जेवणासाठी तासभर मिळतो, मग प्रवाशांना घेण्यासाठी एक मिनीट का थांबता येत नाही?’’ असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
कोणती गाडी थांबली नाही, त्याची तक्रार प्रवाशांनी द्यावी. पळसदेव येथे सर्व प्रकारच्या बस थांबविण्याची सूचना चालक- वाहकांना देण्यात आलेली आहे.
- हनुमंत गोसावी, आगार प्रमुख, इंदापूर
03373, 03374
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.