केसनंद, ता. १२ : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसेवा प्रतिष्ठानच्या फुलगाव (ता. हवेली) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक पाहिले. लोकसेवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून काढलेले शिवेंद्रसिंहराजे यांचे ६ फूट बाय ६ फूट आकाराची प्रतिकृती पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत, शंखनाद आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून केले. बालसैनिकांनी पाहुण्यांना सैनिकी मानवंदना दिली. शालेय प्रांगणातील आर्ट गॅलरीलाही पाहुण्यांनी भेट दिली.
याप्रसंगी लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, उद्योजक प्रशांत तळेकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, विश्वस्त बाळासाहेब चांदेकर, युवराज पाटील, पंकज जगताप, राहुल वागसकर, प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तिरखुंडे, प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप, अश्वदल प्रमुख युवराज राठोड, मर्दानी खेळ प्रशिक्षक अशोक पवार उपस्थित होते.
त्यानंतर ‘ईश्वरपुरम्’ या भारताच्या पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाला भेट दिली. ‘ईश्वरपुरम्’ संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर आणि संदीप पूरकर यांनी परिसरातील बांधकामाची माहिती दिली.