केसनंद, ता. १६ : पेरणे (ता. हवेली) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर, तसेच पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. पेरणेफाटा येथे एक जानेवारीला होणाऱ्या जयस्तंभ शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पेरणेफाटा (ता. हवेली) येथे येत्या एक जानेवारीला ऐतिहासिक जयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक बांधव जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येतात. यातील अनेकजण कुटुंबासमवेत आदल्या दिवशी मध्यरात्रीच्या कार्यक्रमासाठी येऊन जयस्तंभ परिसरातच मुक्कामी राहतात. जयस्तंभ परिसरात आजूबाजूला ऊस शेती व नदीकाठ असल्याने या परिसरातही बिबट्याचा धोका आहे. याच परिसरात गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी बिबट्याने जनावरांच्या गोठ्यात शिरून दोन शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याचा हा संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागाने वेळीच आवश्यक तेथे पिंजरे लावून, तसेच ड्रोनद्वारे सर्वेक्षणासह योग्य कार्यवाही करण्याची गरज स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बाप-लेकाने प्रतिकार करत बिबट्याला हुसकावले
पेरणे गावातील तांबे वस्ती तसेच पाटील वस्तीवरील ठोंबरे यांच्या घराजवळही अनेकवेळा बिबट्या दिसल्याने या ठिकाणी वन खात्याने दोन ट्रॅकिंग कॅमेरे लावले असून, तातडीने पिंजरा लावण्याचीही गरज आहे. तर याच वस्तीवर शनिवारी (ता. १५) मध्यरात्री एकच्या सुमारास बिबट्याने कुंडलिक बबनराव वाळके या शेतकऱ्याच्या गोठ्यातील शेळीवर हल्ला केला. यावेळी कुंडलिक वाळके, तसेच त्यांचे चिरंजीव आकाश यांनी जोरदार प्रतिकार करीत बिबट्याला पळवून लावल्याने शेळीसह अन्य जनावरांचे प्राण वाचले, मात्र यात कुंडलिक वाळके यांना किरकोळ जखम झाली. तर सरडे वस्ती येथेही शंकर सरडे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पेरणे व परिसरात दोन वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. मात्र, बिबट्या पकडण्यात वनखात्याला आजवर यश आलेले नाही. शिरूरच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमापूर्वी परिसरात मुक्कामी येणाऱ्या बांधवांच्या सुरक्षेची बाब गांभीर्याने घेत वन खात्याने तातडीने कार्यवाही करावी.
- उषा दशरथ वाळके, सरपंच, पेरणे
अद्याप पेरणे परिसरातून मोठ्या घटनेची नोंद नाही. तरीही सध्या बिबट्याच्या वाढलेल्या वावराबाबतच्या स्थानिकांच्या तक्रारी, तसेच एक जानेवारीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी वनपथकाला आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
- सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी, हवेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.