केसनंद, ता.२३ : विक्रेता परवाना न घेता पुणे जिल्ह्यात गौण खनिज साठा, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परवाना नसलेल्यांचा विद्युत पुरवठाच खंडित करण्याची कार्यवाही पूर्वहवेलीत महसूल विभागाने सुरू केल्याने गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ अन्वये गौण खनिज विक्रीकरिता विक्रेता परवाना व साठवणूक परवाना दरवर्षी ३१ डिसेंबर पूर्वी घेणे बंधनकारक आहे. तसेच खडी क्रशर वा स्टोन क्रशरसाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजांच्या वापराबाबत परिशिष्ट-अ (आवक नोंदवही) व परिशिष्ट-ब (जावक नोदवही) प्रमाणे नोंदवही ठेवणेही बंधनकारक असून त्याबाबतचा ताळमेळ वेळोवेळी क्षेत्रीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडून तपासण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील संदर्भानुसार जिल्ह्यात एकूण ३७९ स्टोन क्रशर असून क्रशर धारकांच्या उपलब्ध यादीनुसार कार्यक्षेत्रातील क्रशरची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना तसेच गौण खनिजाची विनापरवाना अवैध पद्धतीने विक्री व साठा करणाऱ्या व्यावसायिकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८ (७) व (८) नुसार दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाईचे निर्देशही सर्व तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार नव्या वर्षीच्या परवान्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म विभाग येथे नमुना-प अन्वये आवश्यक कागदपत्रांसह www.mahakhanij.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून २०२६ करिता तातडीने विक्रेता परवाना व साठा परवाना प्राप्त करून घेण्याचे आवाहनही संबंधितांना करण्यात आले आहे. दरम्यान, पूर्व हवेलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोणीकाळभोर तहसील कचेरीकडून व्यावसायिकांच्या संघटनेची बैठक घेत याबाबत सूचित करण्यात आले तसेच संबंधितांना नोटिसीही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही ८२ पैकी केवळ नऊच जणांनी परवाना घेतला आहे; मात्र वेळोवेळी पाठपुरावा करूनही विक्रेता परवाना न घेता पुणे जिल्ह्यात गौण खनिजसाठा, वाहतूक, विक्री करणाऱ्यांचा अखेर विद्युतपुरवठाच खंडित करण्याबाबत तहसील कचेरीकडून महावितरणला कळविण्यात आल्याने गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.