शिक्रापूर, ता.९ : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यातून धामारी (ता.शिरूर) गावची निवड जिओ टॅगिंगसाठी केली आहे. अभियानांतर्गत गावातील सर्व शिवपानंद व वहिवाटींच्या रस्त्यांचे सर्व्हे करून त्यांच्या जिओ टॅगिंगसह त्यांना रस्ते सांकेतांक देण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांचा स्वतंत्र नकाशाही करण्यात येणार असून या कामाला थेट प्रारंभ नुकताच उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केला.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महा-राजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा महसूली सेवा पंधरवडा साजरा होत आहे. यात निवडलेल्या गावातील शिवपानंद व वहिवाटीचे रस्ते यांचे सर्व्हेक्षण करणे, त्यांचे जिओ टॅगिंग करून त्यांना विशिष्ट संकेतांक देणे, सदर सर्व्हेक्षित सर्व रस्ते नकाशावर दर्शवणे आदी कामांचा समावेश आहे. यात महसूल विभाग व भूमिअभिलेख शाखा दोघेही एकाच स्तरावर येवून काम करणार असून याच कामासाठी जिल्ह्यातून धामारी गावची निवड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्यानुसार सदर कामाचा प्रारंभ नुकताच श्रीमती अहिरे व श्री म्हस्के यांनी केला. यावेळी पाबळ मंडलाधिकारी प्रमोद लोखंडे, ग्राममहसूल अधिकारी श्रीमती प्रियंका टिळेकर, दीपाली तवले, दीपक मोरे, अशोक बडेकर व नंदाराम आदक आदींनी सहभाग घेतला. या शिवाय शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अमोल भोसले यांनी उपस्थित ग्रामस्थांना वरील योजनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सीमा शेळके, उपसरपंच जयमाला कापरे, माजी सरपंच संपत कापरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
04965