शिक्रापूर, ता. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) शिरूर ग्रामीणची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे मावळते अध्यक्ष मनोहर परदेशी व कार्याध्यक्ष कुंडलिक कदम यांच्या राजीनाम्याने रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी वार्षिक सभेचे आयोजन नुकतेच शिक्रापुरात संपन्न झाले. यात माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, उद्योगपती मयूर खंडेराव करंजे यांची अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. इतर नियुक्त्यांमध्ये सचिन शिवाजीराव बेंडभर कार्याध्यक्षपदी, मुख्य कार्यवाह म्हणून संभाजी गोरडे, सरकार्यवाहपदी शेखर फराटे, उपाध्यक्षपदी संभाजी चौधरी आदी नियुक्त्या बहुमताने करण्यात आल्या. या शिवाय युवा साहित्यिक आकाश भोरडे, ज्येष्ठ मार्गदर्शक संजीव मांढरे, विठ्ठल वळसे पाटील, कोषाध्यक्ष राहुल चातुर, सहकोषाध्यक्षा प्रा.कुंडलिक कदम तर प्रमुख सल्लागार म्हणून शंकर नऱ्हे, मनोहर परदेशी व भरत दौंडकर अशा सर्व नियुक्त्या यावेळी जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिरूर ग्रामीण शाखेकडून गेल्या १० वर्षांत शिवार साहित्य संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन, राज्यस्तरीय पुस्तक पुरस्कार सोहळा, उत्कृष्ट साहित्यिक व शिक्षक सन्मान, एक दिवसीय साहित्य संमेलन, शिरूर तालुक्यातील बालसाहित्यिकांसाठी काव्यलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच उत्कृष्ट वाचकांचा सन्मान अशा साहित्य प्रोत्साहक अनेक कार्यक्रम यशस्वी केले आहेत. त्याच गतीने शिरूरमध्ये साहित्यप्रेमींची संख्या वाढेल, असे भरीव काम आपण करणार असल्याचे नवनिर्वाचितांनी सांगितले.