शिक्रापूर : लोकसहभागातून पाणलोट विकास या प्रकल्पाअंतर्गत केंदूर (ता.शिरूर) येथे याच परिसरातील पाच गावांमधील शेतकऱ्यांसाठी कांदा लागवड आणि उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवशीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. वॉटर फॉर पिपल इंडिया ट्रस्ट व 3M इंडिया लिमिटेड कंपनी यांच्या आयोजनातून आयोजित या कार्यशाळेत परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादकता आणि उपजीविका वाढविण्याच्या उद्देशाने अनेक उपाययोजना सांगण्यात आल्या.
शास्त्रज्ञ डॉ.योगेश यादव यांच्या नेतृत्वाखाली, या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कांदा रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान, जैविक आणि रासायनिक खत व्यवस्थापन आणि प्रभावी कीटक-रोग नियंत्रण उपाय या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कंपनीचे प्रकल्प समन्वयक तिलक कटरे, कृषी शास्त्रज्ञ यशवंत बहिरम आणि संपूर्ण संच सदस्यांनी व स्थानिक ग्रामपंचायतीने सदर कार्यशाळा आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यशाळेस केंदूर, पाबळ, धामारी, करंदी, वाजेवाडी परिसरातील शेतकरी व शेती शाळा गटातील शेतकरी उपस्थित होते.