सणसवाडी, ता. १८ : येथील किंबर्ली क्लार्क कंपनीमध्ये असलेल्या सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या स्टोअर रूसमधील तब्बल १८ लॅपटॉप लांबवले. शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार स्टोअर रूम सुरक्षारक्षक प्रमुख विराज वादाने व पुरुषोत्तम बनसोडे या दोघा सुरक्षारक्षकांवर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सुरक्षारक्षक विराज वादाने व पुरुषोत्तम बनसोडे (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अनसेक एचआर सर्विस लिमिटेड सिक्युरिटी एजन्सी कंपनीचे विभाग प्रमुख बालकिशन टेकचांद शेरावत (वय ६१, रा. खेसे पार्क, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील किंबर्ली क्लार्क कंपनीमध्ये अनसेक एच आर सर्विस लिमिटेड या नावाने सिक्युरिटी एजन्सी कार्यरत असून तिच्यावतीने या कंपनीला तिच्या गरजेनुसार सुरक्षारक्षक पुरविले जातात. किंबर्ली क्लार्क कंपनीच्या स्टोअररूमसाठी विराज व पुरुषोत्तम हे दोघे सुरक्षारक्षक प्रमुख म्हणून सिक्युरिटी एजन्सीने नेमले होते. त्यानुसार कंपनीने मे २०२५ मध्ये खरेदी केलेले २८ लॅपटॉप, ऑगस्ट २०२५ मध्ये खरेदी केलेले ५० लॅपटॉप हे कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले व त्याची संपूर्ण जबाबदारी सुरक्षारक्षक प्रमुख असलेल्या दोघांवर सोपविली गेली होती. दरम्यानच्या काळात कंपनीचे वतीने मुख्य सुरक्षारक्षक म्हणून नेमलेले सुदर्शन कातखडे हे कंपनीच्या स्टोअररूम मधील साहित्य तपासात असताना त्यांना कंपनीच्या स्टोअररूममधील १८ लॅपटॉप हिशेबात मिळून येत नव्हते. यावर त्यांनी ही बाब एचआर सर्व्हीस लिमिटेड सिक्युरिटी एजन्सी कंपनीचे मालकांना वरील माहिती देऊन, कंपनीतील विराज व पुरुषोत्तम यांच्याकडे चौकशी केली. यावर दोघांनीही कातखडे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावर वादाने व बनसोडे या दोघांनी संगनमत करून कंपनीतील १७ लाख रुपये किमतीचे तब्बल १८ लॅपटॉप चोरी केल्याचे निष्पन्न झाले.