सणसवाडी, ता. १९ : सणसवाडी (ता. शिरूर) येथील शिवांश इंजिनिअरिंगच्या वर्कशॉपमध्ये चोरट्यांनी तांब्याच्या अनेक तयार व कच्च्या मालाची चोरी केली. मोठ्या संख्येने चोरी गेलेल्या या मालाचे मूल्य अद्याप केले नसले तरी चोरी ही जबरी असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
शिवांश इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काही मशिनरी बनवल्या जातात. त्यासाठी लागणारे तांब्याच्या धातूचे वेगवेगळे पार्ट आणून ठेवले जातात. मंगळवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास कंपनीतील कामगार व व्यवस्थापकांनी वर्कशॉप आणि कार्यालय, असे सर्व बंद करून सगळे घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी कंपनीचे व्यवस्थापक शुभम बंकटराव लहाणे (वय २९, रा. वाघोली, ता. हवेली) हे कंपनीत आले. ते कंपनीच्या वर्कशॉपकडे गेले असता त्यांना वर्कशॉपचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून वर्कशॉपमध्ये जाऊन पाहणी केली. त्यात कंपनीतील तांब्याच्या धातूचे वेगवेगळे एकतीस बुश व आठ लाईनर, असा मोठा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार दामोदर होळकर करीत आहेत.