शिक्रापूर, ता. २८ : वाजेवाडी (ता. शिरूर) येथील कावेरी हॉटेलजवळ एका बेशुद्धावस्थेतील व्यक्तीला ग्रामस्थांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. मृताची ओळख पटलेली नसून साधारण ४० वर्षे वयाच्या या मृताच्या तोंडाला थोडे खरचटल्याचे आढळल्याने त्याबाबत अधिक सखोल तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी (ता. २७) वाजेवाडी येथील हॉटेल कावेरी वळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे काळूराम मांजरे यांना दिसल्याने त्यांनी ही बाब ग्रामस्थांना कळविली. दरम्यान, ग्रामस्थांनी या व्यक्तीला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी संबंधिताचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे घोषित केले. या व्यक्तीचा शोध शिक्रापूर पोलिस व स्थानिक नागरिकांनी परिसरात घेतला असता त्याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. मृत व्यक्ती हा अंदाजे ४० वर्षे वयाचा, काळे-पांढरे डोक्याचे केस, अंगाने मध्यम, पिकलेली दाढी, अंगात पिवळ्या रंगाचा टी शर्ट, तोंडाला थोडे खरचटलेले अशा वर्णनाचा असून याबाबत वाजेवाडीचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कचरू नाना वाजे (वय ६८, रा. वाजेवाडी, ता. शिरूर) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार नरेंद्र गायकवाड करीत आहेत.