काटेवाडी, ता. २३ : गोहत्या बंदी कायद्याच्या विरोधात आणि गोरक्षकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुरेशी समाजाने सुरू केलेल्या बाजार बंद आंदोलनामुळे बारामती येथील जनावरे बाजारातील उलाढाल मंदावली आहे. या आंदोलनामुळे संकरित गाई आणि म्हशींच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली तर दर गुरुवारी जळूची येथील जनावरे उपबाजारात सुमारे एक कोटीची होणारी उलाढाल या आंदोलनामुळे ५० ते ६० लाखांपर्यंत आली आहे.
बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बारामती येथील जनावरे बाजारामध्ये बंगरूळ, कोल्हापूर, बेळगाव, सातारा, सांगली, अहिल्यानगर, बीड, जालना आदी भागातील व्यापारी खरेदी विक्रीसाठी येत असत. कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे व्यापारी बाजाराकडे फिरकेन असे झाले आहेत. बारामतीच्या जनावरे बाजारात दर गुरुवारी सुमारे २०० ते ५०० संकरित गाई आणि म्हशींची आवक होत असते. यापैकी २०० ते २५० जनावरांची खरेदी-विक्री व्यापारी करत. मात्र, कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे व्यापारी बाजाराकडे फिरकेनासे झाले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपली जनावरे माघारी न्यावी लागत आहेत.
दूध उत्पादक शेतकरी त्रस्त
दूध उत्पादक शेतकरी या आंदोलनामुळे विशेषतः: त्रस्त आहेत. दुधाचे दर आधीच कमी असताना, आजारी किंवा दूध न देणाऱ्या गाई-म्हशी आणि नर वासरे सांभाळणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. बहुतेक शेतकऱ्यांकडे सुमारे २ ते ८ जनावरे असतात, आणि अनुपयोगी जनावरे विकणे हा त्यांचा एकमेव पर्याय होता. आता खरेदीदार नसल्याने ही जनावरे गोठ्यात ठेवणे परवडत नाही.
गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून बंदी
कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांना जनावरांच्या वाहतुकीदरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कायद्यात बदल करण्याची विनंती केली आहे. मात्र, जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहण्याची शक्यता आहे. कुरेशी समाजाने जून २०२५ पासून अनिश्चितकाळ आंदोलन सुरू केले असून, गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी व्यापारावर बंदी घातली आहे.
बाजारातील मंदी आणि गोरक्षकांच्या अडवणुकीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने यावर तातडीने उपाययोजना करावी. जोपर्यंत कुरेशी समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बारामती जनावरे बाजारातील व्यवहार ठप्प राहण्याची भीती आहे. शेतकरी आणि कुरेशी समाज एकत्रितपणे प्रशासनाकडे आपला त्रास मांडत आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, अशी अपेक्षा आहे. दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सध्या अडचणीत आहेत.
-ॲड. श्रीकांत करे, राज्य समन्वयक दूध उत्पादक संघर्ष समिती
कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे बाजारात व्यापारी दिसत नाहीत. परिणामी बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करता यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.
- अरविंद जगताप, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती
माझ्याकडे सध्या चार नरवासरे व पाच कालवडी आहेत. या सर्वांना दूध पाजायचे म्हणले तर एका वासराला किमान दोन ते तीन लिटर दिवसाला दूध पाजावे लागते. एवढ्या सर्व वासरांना दूध पाजणे शक्य होत नाही. बाजारात गेले तर हे वासरे विकत घेणारे व्यापारी नाहीत. त्यामुळे आता हा गोठाच विकायला काढला आहे. पण तो घेणार तरी कोण?
- साहिल करे, दूध उत्पादक शेतकरी, निमगाव केतकी (ता. इंदापूर)
मागील तीन बाजारांतील उलाढाल
बाजार......... आवक नग............उलाढाल (रुपयांत)
३१ जुलै...........३१९..............६३,४७,३००
७ ऑगस्ट..........५११..............९६,८६,८००
१४ ऑगस्ट.........२९६...............४८,०४,२००
२१ ऑगस्ट.........२५०..............५५,००,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.