काटेवाडी, ता. २० : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठेचा ‘कै. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार २०२४-२५’ पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातील ३४ बाजार समित्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारामती बाजार समितीने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.
पुरस्कार वितरण समारंभात बारामती बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंद्र खलाटे आणि सचिव अरविंद जगताप यांनी संघाचे अध्यक्ष प्रवीण नाहटा आणि उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सभापती आटोळे आणि उपसभापती खलाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगितले. बारामती मुख्य यार्ड तसेच जळोची आणि सुपे उपबाजारांमध्ये समितीने विविध योजना आणि उपक्रम राबवले आहेत. यामुळे शेतकरी, व्यापारी आणि बाजारातील अन्य घटकांना मोठा लाभ झाला आहे. स्मार्ट प्रकल्पातही बारामती बाजार समितीने राज्यात तिसरा आणि विभागात प्रथम क्रमांक मिळवला. सचिव अरविंद जगताप यांनी भविष्यातही शेतकरी आणि बाजार घटकांसाठी आधुनिक सुविधा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा समितीचा मानस असल्याचे सांगितले.
01441