खुटबाव, ता. १९ : दौंड तालुक्यातील एका शाळेमध्ये ४९ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. यावरून सदर शिक्षकावर विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर ग्रामस्थ व शाळा पदाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चोप दिला.
आरोपी शिक्षक हा शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाची तयारी चालू असताना वर्गात आला. त्याने वर्गातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा उजवा हात हातात धरून, ‘आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू,’ असे म्हणून तिच्या शेजारील बाकावर बसला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी फिर्यादी विद्यार्थिनीला घेऊन यवत पोलिस ठाण्याला तक्रार दिली. त्यावरून आरोपीवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस करत आहेत. यासंदर्भात यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, आरोपीला अटक केले आहे.