मंचर, ता.१७ : शहराच्या पश्चिम बाजूला असलेल्या जुना बैल बाजार, चिंचपुरेमळा, बाणखेलेमळा व पांढरेवस्ती या गजबजलेल्या परिसरात रविवारी (ता.१६) अनेकांनी झाडाझुडपांत लपलेला बिबट्या पाहिला त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली तीन ते चार दिवस बिबट मादी व तीन बछड्यांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. गेल्या आठवड्यात मोरडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ दिवसा बिबट्या आला होता. पहाटे, सकाळी व संध्याकाळी अनेक जण तपनेश्वर मंदिरात दर्शनासाठी व फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. पण गेली काही दिवस याभागात बिबट्याचे कुटुंबच फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील अनेक कुत्र्यांचा व पाळीव प्राण्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. “सद्या निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे मुलांना शाळेत ये-जा करताना पालक सोबत असतात. अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणेही बंद केले आहे. मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने बिबट्याला त्वरित जेरबंद करावे,” अशी मागणी शेतकरी अतुल बाणखेले व संजय चिंचपुरे यांनी केली आहे.
14589