पुणे

आंबेगावमध्ये मतदारांची चांगली उपस्थिती

CD

मंचर, ता. ७ : तब्बल पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद गटातील पाच आणि पंचायत समिती गणातील दहा जागांसाठी शनिवारी (ता. ७) शांत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. तालुक्यातील २३९ मतदान केंद्रांवर मतदारांनी चांगली उपस्थिती दर्शवली. विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला.
लोकशाहीप्रती निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण देत अवसरी खुर्द, पेठ, खडकवाडी व घोडेगाव येथील नवविवाहित वधू-वरांनी लग्नमंडपात जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. तर, पोखरी मतदान केंद्रावर १०७ वर्षीय सीताबाई गोविंद आढारी यांनीही मतदान केले. “स्वातंत्र्यानंतरची एकही निवडणूक मी चुकवलेली नाही,” असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच उमेदवारांनी मतदारांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची व्यवस्था केली होती. मतदानानंतर अनेक ठिकाणी वडापाव, मिसळ, चहा तसेच शिरा-लाडूचीही व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक नागरिकांना मतदान करण्यासाठी आग्रह करताना दिसले.
राजकीय वातावरण मात्र तुलनेने संयमी होते. निकालानंतर कोण कोणाला पाठिंबा देणार याबाबत अनिश्चितता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखा टोकाचा संघर्ष दिसला नाही. उलट अवसरी खुर्द, गावडेवाडी, पेठ, पिंपळगाव, धामणी, कुरवंडी, शिनोली आदी गावांत प्रतिस्पर्धी कार्यकर्तेही हसतखेळत गप्पा मारताना दिसले. राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजप यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आघाडी करत परस्परपूरक उमेदवार दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसनेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. पारगाव तर्फे-अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे पाटील व शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यात प्रमुख लढत आहे. दोघेही जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असल्याने ही लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे. येथे भाजपचे किरण वाळूंज व गणेश काकडे हे अपक्ष उमेदवार आहेत. कळंब, पारगाव, पेठ व घोडेगाव या पंचायत समिती गणांमध्ये स्थानिक उमेदवारांमध्येच थेट लढत असल्याने मतदारांचा उत्साह अधिक होता. अनेक केंद्रांवर लांब रांगा दिसून आल्या.

मदतीचा हात
अनेक मतदान केंद्रावर एनसीसी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ मतदारांना केंद्रापर्यंत ने-आण करण्याची स्वयंसेवी सेवा दिली.

गोंधळ अन् तत्परता
नारोडी फाटा-लांडेवाडी येथील १०२ क्रमांकाचे मतदान केंद्र पेठ गणात असल्याच्या गैरसमजामुळे उमेदवारांनी त्यानुसार प्रचार केला; मात्र ते केंद्र प्रत्यक्षात घोडेगाव गणात असल्याचे कळताच उमेदवारांनी तातडीने येथे घरोघरी जाऊन मतदारांची मनधरणी केली. या घटनेची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT