माळेगाव, ता. १५ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे यांची गुरुवारी (ता. १५) बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत सदस्यपदी अॅड. राहुल अशोकराव तावरे व किरण खोमणे यांनाही बिनविरोध काम करण्याची संधी देण्यात आली. या निवड प्रक्रियेत उपगटनेत्या म्हणून साधना स्वरूप वाघमोडे व प्रतोद म्हणून धैर्यशील मुरलीधर तावरे यांची नियुक्ती केली, अशी माहिती नगराध्यक्ष सुयोग सातपुते व गटनेते जयदीप तावरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या निवड व नियुक्त्या करण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात राजकीयदृष्ट्या माळेगाव नगरपंचायत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. जनमत विकास आघाडीला बरोबर घेऊन अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक बहुमताने जिंकली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सुयोग सातपुते नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतरच्या कालावधीत पक्षाने नवनिर्वाचित नगरसेवक जयदीप दिलीपराव तावरे यांच्याकडे गटनेते पद दिले होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत दोन नगरसेवक, प्रतोद व उपगटनेते पदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
दरम्यान, नगराध्यक्ष सुयोग सातपुते, मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या आधिपत्याखाली गुरूवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची सभा पार पडली. त्यामध्ये उपनगराध्यक्षा वृशाली तावरे, स्वीकृत नगरसेवक अॅड.राहुल तावरे, किरण खोमणे यांना काम करण्याची संधी मिळाली, तसेच उपगटनेते म्हणून साधना वाघमोडे,प्र तोद म्हणून धैर्यशील तावरे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने जबाबदारी दिली.
माळेगाव नगरपंचायतीच्या विकास कामांना कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर भक्कम पाठबळ देण्याची माझी भूमिका आहे. अर्थात अजितदादांनी तोच धागा पकडून मला स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. यापुढील काळात माळेगावचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शासनस्तरावर साडेतीनशे कोटी रुपये अजितदादांनी मंजूर केले आहेत. त्या निधीचा विनियोग माळेगावकरांच्या सुख सोयींसाठी नक्की उपयोगात आणला जाईल, असे मत नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक अॅड. राहुल तावरे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.