माले, ता. ६ : सुधागड वन्यजीव अभयारण्य, ठाणे (वन्यजीव) विभागाच्या वतीने अभयारण्य परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने निसर्ग मार्गदर्शक (गाइड्स) प्रशिक्षणाची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत एकूण २५ स्थानिक युवक व ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले.
आदरवाडी (ता. मुळशी) येथील गरुडमाची परिसरात हे प्रशिक्षण पार पडले. सुधागड वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या मुळशी धरण परिसरातील अंधारबन भागातील पिंपरी (ता. मुळशी) येथील १६ युवक तसेच सुधागड तालुक्यातील किल्ले सुधागड व ठाणाळे कोरीव लेणी परिसरातील ९ युवक अशा एकूण २५ जणांचा या प्रशिक्षणात सहभाग होता.
पर्यटन वाढीच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व क्षमतावर्धन मिळावे, या उद्देशाने भारतीय वनसेवेतील ठाणे (वन्यजीव) विभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हाय प्लेसेस मॅनेजमेंट प्रा. लि., पुणे यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये पर्यटकांशी संवाद साधण्याची पद्धत, वर्तन व शिष्टाचार, अचूक व विश्वासार्ह माहिती कशी द्यावी, सभ्यतेचे नियम, पर्यटकांची सुरक्षितता तसेच जबाबदार पर्यटन यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस फणसाड वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक मनोहर दिवेकर, सुधागड वन्यजीव अभयारण्याचे वनक्षेत्रपाल उमेश जंगम, वनपाल सागर भोसले, रवींद्र म्हात्रे यांच्यासह प्रशिक्षक इंद्रजित पवार, अनीश परशुरामी व उभे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून अभयारण्य परिसर, अंधारबन, सुधागड किल्ला तसेच ठाणाळे लेणी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशिक्षित व जबाबदार निसर्ग मार्गदर्शक उपलब्ध होणार आहेत.