मोरगाव,ता.२१ : बारामती तालुक्यामध्ये ११ मंडलामधील एक अशा ११ ठिकाणी पाणंद रस्त्यांसाठी विशेष ग्रामसभा नुकताच घेण्यात आली. मोरगाव मंडलामधून तरडोली गावाची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्या यासंदर्भात सरकारने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाद्वारे दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम सध्या महसूल विभाग व ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने सुरू आहे. हा सेवा पंधरवडा राज्यभर तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना भविष्यकाळातील कायमस्वरूपी त्यांच्या सोयीसाठी पाणंद रस्ते करणे, सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबविणे, स्थानिक परिस्थितीचा विचार करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे याचा समावेश असल्याची माहिती मोरगाव मंडलच्या मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी दिली. मोरगाव मंडलामधील ११ गावांमध्ये शिवार फेरी, सर्वेक्षण करून ग्राम नकाशावर नोंद असलेले व नसलेले रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार करण्यात आली होती. सर्व गावांमध्ये १७ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये प्राथमिक यादी सादर करून मान्यता घेण्यात आली व तसा ग्रामसभेचा ठराव करण्यात आला. तसेच ग्रामसभेमध्ये सुचविलेले नवीन रस्ते या यादी समाविष्ट करण्यात आले. मंजूर यादी ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी यांनी बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे सादर करून भूमी अभिलेख विभागाने या कालावधीमध्ये या रस्त्यांचे मोजणी व सीमांकन करावयाचे आहे.
शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी, शेतीमाल बाजारात पोचविणे व दैनंदिन शेतीतील कामासाठी ये-जा करण्यासाठी शेत रस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात मूळ जमाबंदीची वेळ ही तयार करण्यात आलेली नकाशामध्ये तसेच एकत्रीकरण योजना वेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिवरस्ते व गाडी मार्ग दर्शविण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर नवीन रस्त्यांच्या नोंदी कागदप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी अतिक्रमण यासारख्या समस्या उद्भवत आहेत. सरकारच्या या उपक्रमामुळे रस्त्यांच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अद्ययावत होतील. याशिवाय शेतकऱ्यांची सोय सहजतेने होण्यास मदत होणार असल्याची माहिती तरडोलीचे ग्राम महसूल अधिकारी दिगंबर घोरपडे यांनी दिली.
शुल्क आकारले जाणार नाही
या रस्त्यांच्या मोजणी व सीमांकनासाठी आवश्यक असलेले शुल्क भूमी अभिलेख विभागामार्फत आकारले जाणार नाही. तसेच या रस्त्यासाठी विशिष्ट सांकेतांक निश्चित करण्यात येणार आहे. हा उपक्रम बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोरगाव मंडळ अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी सेवा पंधरवड्यात करावयाचा कृती आराखडा ग्राम महसूल अधिकारी यांना दिलेला आहे.
३९ रस्त्यांबाबत चर्चा
तरडोली येथे ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत गावातील ३९ रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यापैकी चार रस्ते नकाशावर आहेत. उर्वरित ३५ रस्त्यांपैकी तीन रस्त्यांना हरकती प्राप्त झाल्या. तसेच नवीन १४ रस्ते यावेळी यादीत समाविष्ट करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.