माळशिरस, ता. १४ : पुरंदर तालुक्यातील यापूर्वी असणाऱ्या ३७ गावांच्या प्रमाणे उर्वरित सर्व गावे लवकरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणार असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
शिवतारे म्हणाले की, पुरंदर तालुक्यात एकूण १०४ महसुली गावे आहेत. याशिवाय दोन ‘ब’ वर्ग नगरपालिका आहेत.यातील पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ३७ गावे तर उर्वरित गावे ही प्राधिकरणाच्या बाहेर होती. तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड आणि आयटी पार्क असे अनेक प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. याशिवाय तालुक्यात जेजुरीचे खंडोबा मंदिर, पुरंदर किल्ला, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळे येथील प्रतिबालाजी मंदिर, वीर आणि कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर अशी तीर्थ व पर्यटनक्षेत्रे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे पुणे शहरात समाविष्ट इतर गावांमध्ये ज्या पद्धतीने नियोजनाअभावी बकालपणा वाढला तशी स्थिती पुरंदर तालुक्यात निर्माण होऊ नये आणि आखीव रेखीवपणे शहरे आणि गावे विकसित व्हावीत यासाठी एकाच नियोजन प्राधिकरणाच्या छताखाली सर्व तालुका आणला जावा अशी मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबत पीएमआरडीएने शासनाला सकारात्मक अहवाल पाठवला असून सर्व गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत आणण्यासाठी नगरविकास विभागाकडून तयारी सुरू आहे. मधल्या काळात रिंगरोडच्या सभोवती येणारी २३ गावे ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.