दत्ता जाधव ः सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २१ : टेकवडी (ता. पुरंदर) येथील ब्राह्मण घाटापासून पिसर्वे, मावडी, पिंपरी ते रोमणवाडीपर्यंतचा चार कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावरील निधी खर्च करूनही नागरिकांची वाहतुकीची आहे तीच गैरसोय होत आहे.
या रस्त्याचे काम १२ महिन्यात पूर्ण करण्याची तरतूद होती. मात्र, ठेकेदारांनी काम पूर्ण करण्यास विलंब करण्याबरोबरच काम करतानाच अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले होते. काम सुरू असतानाच रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या. नागरिकांनी प्रशासनाकडे तोंडी तक्रारी केल्यानंतर संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराने वर्षभरापूर्वी तात्पुरती मलमपट्टी करून कसे बसे खड्डे बुजविले होते. मात्र, सध्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम करत असताना आवश्यक त्या प्रमाणात संबंधित ठेकेदारावर तक्रार देऊनही अंकुश ठेवला न गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे नागरिकांचे मत आहे. या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही .
ब्राह्मण घाट- रोमणवाडी रस्ता
अंतर - १८ ते २० किलोमीटर
खड्डे संख्या- १० ते १२ एक किमीमध्ये
मागील सात वर्षातील खर्च - ३ कोटी ९४ लाख
रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदारांनी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने अल्पावधीत हा रस्ता खराब झाला आहे. शासनाने संबंधित ठेकेदाराला या रस्त्यावर मुदतीच्या आतमध्ये काम करण्याबाबत सूचना करून त्वरित दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अन्यथा या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- बाळासाहेब कोलते, माजी सरपंच, पिसर्वे
02612