माळशिरस, ता. १० : फूल उत्पादकांना दसरा व दिवाळीत पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. मात्र, याची कसर मार्गशीर्ष महिन्यामध्ये निघेल, असे चित्र सध्या बाजारात दिसत आहे. आठवड्यावर मार्गशीर्ष महिना आलेला असतानाच, बिजली, अस्टरच्या फुलांच्या बाजारभावाने शंभरी पार गेल्याने मार्गशीर्षमध्ये लक्ष्मी नक्की पावणार आहे, असा विश्वास जिल्ह्यातील उत्पादकांना आहे.
फूल उत्पादकांसाठी गणपती, दसरा, दिवाळी व त्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना व लग्नसराई हा महत्त्वाचा हंगाम मानला जातो. यामध्ये यंदा दसरा, दिवाळी व गणपती या काळात पावसाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने फूल उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऐन फूल तोडणीच्या हंगामात व सणासुदीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने तोंडास आलेला घास हिरावला गेला होता. मात्र, याची कसर मार्गशीर्ष महिन्यातील हंगामात निघेल, असे स्पष्टपणे सध्या दिसत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा मोठ्या प्रमाणावर उत्सव ग्रामीण भागात व शहरी भागात घरोघरी महिलांकडून केला जातो. यामुळेच या काळात फुलांना चांगली मागणी राहते. मागील पावसाच्या परिणामामुळे फुलांच्या लागवडी अनेक ठिकाणी होऊनही त्या खराब झालेले असल्याने मार्गशीर्षसाठी वापरल्या जाणाऱ्या शेवंतीवर्गीय पौर्णिमा फुलांचे आवक सध्या बाजारात अत्यंत कमी प्रमाणात होत आहे.
बाजारभाव १५० ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाणार
मार्गशीर्ष महिना अजून आठ-दहा दिवस असताना देखील शेवंतीवर्गीय पौर्णिमाची फुले शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकिलोपर्यंत पुणे येथील बाजारात विकली जात आहेत. तीच परिस्थिती झेंडू फुलांच्या बाबत देखील असून झेंडूची फुले देखील आज ५० ते ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पुणे येथील बाजारात विकली गेली, कापरी फुलांची अवस्था देखील अशाच प्रकारे आहे. आजच फुलांचे बाजारभाव हे असे असतील तर पुढील काळामध्ये मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यानंतर हे बाजारभाव १५० ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत निश्चित जातील, असे फूल उत्पादकांसह व्यापारी वर्ग देखील बोलत आहेत.
बाजारातील पौर्णिमा व झेंडूच्या फुलांची सध्या होणारी आवक पाहता व दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या मुहूर्तावर या फुलांना असणारी मागणी विचारात घेता या दोन्ही फुलांसह सर्वच फुलांचे बाजारभाव मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत चांगल्या दराने होतील. यामुळे फूल उत्पादकांना यातून निश्चित दोन पैशाचा चांगला लाभ होईल.
- पप्पू जराड, फूल विक्रेते, मार्केट यार्ड, पुणे
मार्गशीर्ष महिन्यात फुले तोडण्यास येण्यासाठी साधारणतः ऑगस्ट महिन्याचा पोर्णिमा फुलांची लागवड करावी लागते. मात्र, या काळात सततच्या पावसाने लागवडीसाठी वापसा योग्य जमिनी नसल्याने लागवडी कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी लागवडी करूनही पावसाने खराब झाल्याने पोर्णिमा फुलातून चांगले दिवस पुढील काळात येतील.
- रामदास वाघले, फूल उत्पादक, पोंढे
फुलांचे कमाल बाजारभाव रुपयांत (प्रतिकिलो)
पौर्णिमा शेवंती......... १००
बिजली......... १००
अस्टर......... १००
गुलाब ......... ८०
गुलछडी......... ८०
व्हाइट शेवंती ......... ७०
झेंडू......... ६०
कापरी......... ६०
02693
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.