माळशिरस, ता. २७ : गुरोळी गावात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामार्फत विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत येथे घेण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात नागरिकांना महसूल विभाग तसेच शासनाच्या इतर विभागाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.
या शिबिरात उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते दाखले वाटप केले. या वेळी पुरवठा नायब तहसीलदार गोपाळ ठाकरे, मंडल अधिकार डी. सी. शेळकंदे, ग्राम महसूल अधिकारी स्वाती पाटील, कृषी अधिकारी कल्याणी झुरंगे, ग्रामपंचायत अधिकारी नीलम धावत्रे, सरपंच रेणुका खेडेकर, उपसरपंच जीवन खेडेकर, माजी सरपंच हिरामण खेडेकर, प्रकाश खेडेकर, मधुकर खेडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी एकूण १० स्टॉल लावले होते. शिबिरात सामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला व दिव्यांगांना विविध प्रकारच्या सेवा जातीचे दाखले, कुणबी दाखले, डोमासाईल, उत्पन्न दाखले, दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड, लक्ष्मी मुक्ती योजना, आयुष्यमान भारत कार्ड, फेरफार व सातबारा असे विविध दाखले वाटप केले. शिधापत्रिका किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते, मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा गावातच मिळाल्याने वेळ व पैसा वाचल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.
या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीवर त्वरित मिळाल्याने नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यापुढेही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येईल.
- विक्रम राजपूत, तहसीलदार