माळशिरस, ता. ११ : पुरंदर तालुक्यातील बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटात झालेल्या चुरशीच्या पंचरंगी लढतीत भाजपचे अजय इंगळे यांनी बाजी मारली आहे. मात्र, अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच आघाडीवर असल्याच्या समजातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अकाली जल्लोषाची तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सर्वाधिक उमेदवार असलेली व चुरशीची लढत बेलसर-माळशिरस या गटामध्ये होत होती. या गटात भाजपकडून अजय इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गौरव कोलते, काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, शिवसेनेकडून रमेश इंगळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कामठे हे दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. पाचही उमेदवारांकडून अत्यंत त्वेषाने व मोठ्या आर्थिक ताकतीसह निवडणूक लढवली जात होती.यामुळे येथील निवडणूक निकालात कोण बाजी मारणार याकडे या गटासह संपूर्ण तालुका व जिल्ह्यातील जाणकारांचे लक्ष होते.सर्वच उमेदवारांना आपणच विजयी होऊ असा विश्वास वाटत असल्याने निकालाच्या दिवशी या गटाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांसह त्यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने तयारीनिशी मतमोजणी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित होते. निकालाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गौरव कोलते हे आघाडीवर असल्याचे सांगितले गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांना उचलून घेत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे यांनी काही काळ आघाडी घेतल्याचे समजल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देखील त्यांना खांद्यावर उचलून घेत हार घालून भंडाऱ्याची उधळण करण्यास सुरुवात केली .या जल्लोषातच अंतिम निकाल बाहेर आल्यानंतर भाजपचे अजय इंगळे विजयी झाल्याचे निश्चित झाले. यामुळे या अगोदरचा जल्लोष करणारे सगळे कार्यकर्ते निराश होऊन मतदान मोजणी ठिकाणाहून निघून गेले.त्यानंतर या गटातून विजयी झालेले उमेदवार अजय इंगळे यांच्या सह त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. गटातील विजयी उमेदवारासह इतर पराभूत उमेदवारांनी ही अशा प्रकारे साजरा केलेल्या जल्लोषाची तालुक्यात चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.