हिर्डोशी, ता.२८ : नाटंबी (ता.भोर) येथील प्रगतशील युवा शेतकरी संग्राम रामचंद्र जेधे यांनी भात व उसाच्या शेतीला फाटा दिला व मागील वर्षी भात खाचरातील २० गुंठ्यांत आधुनिक पद्धतीने अंकुर वाणाच्या केळी वांग्याच्या शेतीचा प्रयत्न यशस्वी केला. योग्य नियोजनाच्या जोरावर जेधे यांना १८ टन विक्रमी उत्पादन घेतले व अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. मागणी असलेल्या नवीन वांग्याच्या प्रयोगाची शेती केल्याने उत्पन्न वाढून जेधे यांनी प्रगतीचा आलेख उंचावला आहे.
भात, उसासह अल्पप्रमाणात बागायत शेती करणाऱ्या जेधे यांनी सायबेज आशा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच धाडसाने निर्णय घेत वांग्याची शेती केली. एक एकराच्या भात खाचरातील २० गुंठे जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करून मल्चिंग पेपरचा वापर करत १९ बेड तयार केले. सायबेजने १० जानेवारीला दिलेल्या अंकुर ७७६ या जातीच्या दोन हजार ५०० रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. दोन महिन्यांनंतर १५ मार्च रोजी पहिल्याच तोड्यात मिळालेल्या ५० किलो वांग्याना प्रतिकिलोस दहा रुपये बाजारभाव मिळाला. पुढे वांग्याची वाढ मोठ्याप्रमाणात झाल्याने दिवसाआड तोडे होऊ लागले. आठवड्यात टनभर माल निघू लागला. सुरुवातीला मिळत असलेल्या १० ते १५ रुपये बाजारभावात वाढ होऊन मे महिन्यापासून ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोस बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यापासून चारशे किलो वांग्याची तोड होत आहे. नोव्हेंबरपर्यंत तोडे सुरू राहिल्यास उत्पादनात अधिक वाढ होण्याची आशा जेधे यांनी व्यक्त केली आहे.
सायबेज आशाचे प्रोत्साहन
सायबेज आशा संस्थेने नाटंबी गाव दत्तक घेतले असून शेतकऱ्यांना मदत करत आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. सायबेजकडून ड्रीप, मल्चिंग पेपर, रोपे, चिकट सापळे व तांत्रिक मार्गदर्शनाची मदत करण्यात आली. संस्थेकडून मंगेश सोनवणे, सागर सहाणे, प्रदीप दळवे यांचे तर नाशिकचे कृषी तज्ज्ञ प्रमोद देवरे, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जेधेंना कुटुंबाची आणि मित्रांची मदत मिळाली.
दृष्टिक्षेपात
लागवडीचे क्षेत्र .........२० गुंठे
रोपे.........२ हजार ५००
उत्पादन.........१८ टन
बाजारभाव.........सरासरी २३ रुपये प्रतिकिलो
एकूण उत्पन्न.........४ लाख १४ हजार
निव्वळ नफा .........२ लाख ५० हजार
उत्पादन खर्च
मजुरी.........६० हजार रुपये
खते व औषधे.........८० हजार
वाहतूक व इतर खर्च.........२४ हजार
झालेला एकूण खर्च.........१ लाख ६४ हजार
पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात केलेल्या बागायत शेतीतून मिळालेल्या चांगल्या उत्पादनाबाबत समाधानी आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यावर चांगल्या प्रतिचा बाजारभाव मिळून चांगले उत्पन्न मिळवू शकतो. असा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसायातून जीवनात प्रगती साधली पाहिजे.
- संग्राम जेधे, युवा शेतकरी, नाटंबी
02399