हिर्डोशी,ता.१५: भोरचे सुपुत्र दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचे आपल्या भागासाठी असलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकासाठी आमदार फंडातून २० लाख तर सीएसआर फंडातून १० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच आपटी विद्यालयास १० लाख निधी देणार असून गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिले.
आपटी (ता.भोर) येथे दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त रविवारी (ता.१४) झालेल्या अभिवादन आमदार मांडेकर सभेत बोलत होते. स्मारकाला प्रथमतः अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माध्यमिक विद्यालय आपटी येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत कवी नितीन चंदनशिवे यांनी कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करून खासदार साळुंके यांचा जीवनपट सांगितला. या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवा, आम्ही सहकार्य करू तसेच स्मारकाला लागेल तो निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे जिल्हा परिषदेचे रणजित शिवतरे यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, विकास निकम, वसंत साळवे, महेंद्र कवचाळे यांनी मनोगते व्यक्त केली. राजाभाऊ कांबळे, यशवंत डाळ, नितीन थोपटे, प्रवीण जगदाळे, रघुनाथ पारठे, जगन्नाथ पारठे, संदीप खाटपे, संदीप गायकवाड, सुनील मोरे, महेंद्र सपकाळ, आनंदा सातपुते, रोहिदास जाधव, प्रवीण ओव्हाळ, नवनाथ कदम यांसह जिल्हा व तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य लाभलेले आपटीचे उपसरपंच अविनाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आनंदा जाधव व मयूर गायकवाड यांनी तर राजन घोडेस्वार यांनी आभार मानले.