नारायणगाव, ता. १३ : खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व हिरवा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उत्पन्नातील घट टाळण्यासाठी या रोगावर वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे, असे मत नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी व्यक्त केले आहे.
सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक तर हिरवा मोझॅक हा रोग मोझॅक या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत. पिवळी झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक (केवडा) प्रादुर्भावग्रस्त झाडे आहेत. तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. वेळेत नियंत्रण न केल्यास सोयाबीन उत्पादनात ७५ टक्के घट होऊ शकते.
विषाणूची लक्षणे
हिरवा मोझॅक : यामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात.
पिवळा मोझॅक : सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरे पाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.
रोगाचा प्रसार : प्रामुख्याने बियाणे, रसशोषक मावा, पांढरी माशी किडीमार्फत पसरतो
नुकसानीचा प्रकार:
दोन्हीही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले, शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात.
असे करा एकात्मिक कीड व्यवस्थापन
• विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या निरोगी सोयाबीन बियाणे वापरावे.
• लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्यात.
• मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे बांधावर न टाकता नष्ट करावीत.
• मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्युजी ८० ग्रॅम (४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड २५ टक्के +बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम (५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९ टक्के +इमिडाक्लोप्रीड १९.८१टक्के ओडी १४० मिली (७ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने)यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.
• पिकात प्रति एकरी ४० पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.
• नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा.
07044
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.