नारायणगाव, ता. २६ : गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद हे दोन्ही सण समान कालावधीमध्ये येत असल्याने ईद- ए- मिलादनिमित्त काढण्यात येणारी मिरणूक दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, वारुळवाडी, आर्वी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, येडगाव, वडगाव कांदळी, निमगाव सावा भागातील मुस्लिम समाजाने घेतला आहे. त्यानुसार ईद- ए-मिलादनिमित्त ५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी नियोजित मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिले.
गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. ६ सप्टेंबर रोजी गणेश मूर्तीचे विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. ५ सप्टेंबर रोजी ईद- ए- मिलाद सण आहे. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण असणार असल्याने
नारायणगाव पोलिस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नारायणगाव मुस्लिम जमातचे अध्यक्ष ऐजाज आतार, दादाभीयाँ पटेल, हाजी सिद्दीक शेख, हाजी कुरेशी, उस्मान पठाण, फकीर मोहम्मद मोमीन, जुबेर आतार, तौसीफ कुरेशी, रज्जाक काझी, मुनीर भाई कुरेशी, जावेद पटेल, सकलेन आतार, अश्फाक पटेल आदी मान्यवर व निमगाव, वडगाव कांदळी, पारगाव, येडगाव, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, पिंपळगावतर्फे नारायणगाव भागातील मशीद समितीचे अध्यक्ष व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी शेलार यांनी केलेल्या आवाहनानाला प्रतिसाद देत ईद- ए- मिलादनिमित्त काढण्यात येणारी नियोजित मिरवणूक ५ सप्टेंबरऐवजी ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय नारायणगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील मुस्लिम बांधवांनी घेतला, अशी माहिती अश्पाक पटेल यांनी दिली. या निर्णयाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार यांनी स्वागत केले असून त्यामुळे सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होणार आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.