नारायणगाव, ता. १६ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मीना नदी पात्रातील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ तुळशीराम भीमा मधे
(वय ४५, रा. पांगरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) या व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी (ता. १६) सकाळी आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला? हा अपघात आहे की घातपात, याचा तपास नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने सुरू करण्यात आला असून, श्वान पथकाला पाचारण केले आहे.
नारायणगाव येथील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ मंगळवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याला मिळाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, फौजदार जगदेव पाटील, हवालदार मंगेश लोखंडे, संतोष कोकणे, पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. चौकशीत मृत व्यक्तीचे नाव तुळशीराम मधे असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने व मोठ्या स्वरूपात रक्तस्राव झाला असल्याने या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार यांनी दिली.