पुणे

आणखी किती दिवस झुंज?

CD

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २५ : जुन्नर तालुक्यात सन २००१पासून मानव- बिबट संघर्ष सुरू आहे. सन २००१पासून २४ सप्टेंबर २०२५पर्यंत मागील २५ वर्षांत जुन्नर वन विभागाच्या परिक्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात बिबट हल्ल्यात ५३ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १४७ जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. बिबट हल्ल्यात २६ हजार ७३९ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मागील २५ वर्षात बिबट समस्येचे मुळापासून निराकरण करून बिबट संख्या नियंत्रणात आणण्यात वनविभाग, राज्य व केंद्र शासनाला अपयश आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गाजावाजा झालेल्या बिबट नसबंदी उपाययोजनेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
बिबट्यापासून कधी मुक्ती मिळेल, या विवंचनेत शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक आहेत. अजून किती वर्ष बिबट्याशी झुंज करावी लागणार, अजून किती जणांच्या मृत्यूची शासन वाट पाहणार? असा प्रश्न हतबल झालेल्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

ऊस क्षेत्र मूळ समस्या
जुन्नर वन विभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण, शिरूर या कार्यक्षेत्रातील प्रामुख्याने जुन्नर तालुक्यात बिबट मानव संघर्षाने तीव्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील नाणेघाट, माळशेज, चिल्हेवाडी, पाचघर भागात मूळ वास्तव्य असलेला बिबट्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्याच्या ऊस क्षेत्रात स्थिरावला आहे. ऊस शेतीत निवारा व पशुधनाच्या माध्यमातून अन्न सहज उपलब्ध झाले. बिबट्यांना पोषक वातावरण मिळाल्यामुळे त्यांचा प्रजननाचा दर झपाट्याने वाढला असून मृत्यू दर कमी झाला आहे. मादी बिबट्याचा प्रजनन कालावधी एक ते दीड वर्षाचा झाला आहे. मादी बिबट एका वेळेस चार पिल्लांना जन्म देतो. अनुकूल वातावरणामुळे मृत्युदर कमी झाल्याने बिबट्यांची संख्या वाढली आहे. पिंपळगावतर्फे नारायणगाव येथे दीड महिन्यात चार मादी बिबटे जेरबंद झाले आहेत. यावरून वाढलेल्या बिबट्यांची संख्या अधोरेखित झाली आहे.

२५ वर्षांपासूनची समस्या
बिबट्याच्या हल्ल्यातील पहिला बळी जुन्नर तालुक्यात सन २००१मध्ये गेला. त्यानंतर सन २००१- २००३ दरम्यान दोन वर्षात १७ शेतकऱ्यांचा व ३३ पशुधनांचा मृत्यू झाला. त्यानंतर शासनाला खडबडून जाग आली. नरभक्षक बिबटे पिंजरा लावून पकडणे व मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे, ही मोहीम सुरू केली. मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना सुरुवातीच्या काळात सुमारे तीस हजार रुपयांची मिळणारी मदत आता २५ लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. ५३ मृतांच्या कुटुंबीयांना पाच कोटी ३१ लाख १३ हजार ९०० रुपयांची, १४७ जखमींना ६६ लाख रुपयांची, तर २६ हजार ७३९ पशुधनांचा मृत्यूसाठी २० कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मात्र, आर्थिक मदत हा केवळ आधार असून बिबट समस्या वरील कायमस्वरूपी उपाययोजना नाही. तसेच, पिंजरा लावून एकूण किती बिबटे जेरबंद केले ते कोठे सोडले, याची माहिती दिली जात नाही.

बिबट्याने बदललेल्या सवयी
- शेतात लपून-छपून वास्तव्य करणारे बिबटे आता भटक्या कुत्र्यांप्रमाणे फिरताना दिसत आहेत.
- पशुधनाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी गोठे बंदिस्त केल्याने अन्न पाण्याच्या शोधात थेट मानव वस्तीत दिसू लागले आहेत.
- एकटे दिसणारे बिबटे आता २ ते ३ च्या संख्येने झुंडीने मानव वस्तीत फिरू लागले आहेत.

वनविभागाने केलेल्या उपाययोजना
- बिबट वन क्षेत्रात वन कर्मचाऱ्यामार्फत गस्त घालणे.
- बिबट प्रवण क्षेत्रातील सात तालुक्यात ४०० जलद बचाव पथकाची निर्मिती
- बिबट प्रवण क्षेत्रातील शेतीसाठी दिवसा थ्री फेजचा वीजपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा
- जनजागृतीसाठी बिबट कृतीदल बेस कॅम्प
- प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना बिबट नसबंदीसाठी प्रस्ताव सादर
- अतिसंवेदनाशील ठिकाणांची माहिती घेण्यासाठी जुन्नर येथे कंट्रोल रूमची स्थापना.
- बिबट बंदिस्त करण्यासाठी २१२ पिंजरे, ३५ ट्रॅप कॅमेरे, थर्मल ड्रोन, वेल केजेसची उपलब्धता.
- माणिकडोह येथे १२.६९ हेक्टर क्षेत्रात बिबट निवारा केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम सुरू.
- ४१० मेंढपाळांना तंबू व सौर दिव्यांचे वाटप.
- वन्य प्राण्यांची माहिती मिळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजंट (एआय) प्रणालीचा वापर.
- जुन्नर वनपरिक्षेत्रात सहा ठिकाणी ए आय प्रणाली कार्यान्वित.
- अनुदानावर शेतातील १५० घरांना सौर ऊर्जा कुंपण.
- आपत्ती व्यवस्थापनासाठी ४०० आपाद मित्रांची नेमणूक.
- ३ हजार ३०० शेतकऱ्यांना नेक गार्डचे वाटप.
- ७५ ठिकाणी ॲनायडर्स यंत्रणा कार्यान्वित.
- जुन्नर विभागातील सात वनपरिक्षेत्रात वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांची एकूण संख्या २०४.

बिबट समस्या दृष्टीक्षेपात
- २५ वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यू- ५३, जखमी- १४७
- २५ वर्षांत बिबट हल्ल्यात पशुधनांचा मृत्यू- २६ हजार ७३९
- माणिकडोह बिबट निवारा केंद्राकडून सन २०२० ते २०२५ दरम्यान पुनर्मिलन केलेले बिबट बछडे- १८५
- रेस्क्यू पथकाने जीवदान दिलेले बिबटे- २३८
- सन २०१८ ते २०२५ दरम्यान वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेले बिबटे- १३३
- सन २०१८ ते २०२५ दरम्यान नैसर्गिकरित्या मृत्यू झालेले बिबटे- १५०

बिबट नसबंदी करणे, श्रेणी एकमधून वर्ग दोनमध्ये बिबट्याचा समावेश करणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिबट समस्येबाबत चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, सर्वपक्षीय नेते, संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या समावेत ३० ऑक्टोबर रोजी जुन्नर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर

बिबट नियंत्रणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. बिबट समस्येचे काही लोक राजकारण करत आहेत. वनविभाग व शासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे बिबट समस्या कमी झाली नाही. २५ लाख रुपये देऊन माणसाचा जीव पुन्हा मिळणार नाही. बिबट नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना हा बिबट समस्येवरील एकमेव एकमेव उपाय आहे.
- अतुल बेनके, माजी आमदार

Ajit Pawar : संकटाच्या काळात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सरकार पाठीशी राहणार

इलेक्ट्रिक SUV चाहत्यांसाठी खुशखबर! Volvo EX30 ची भारतात एन्ट्री; वाचा दमदार फीचर्स आणि धमाकेदार किंमत

Pune News : ससूनमध्ये रुग्णाची उडी मारून संपविले जीवन?

Mahadevi Elephant Return : कोल्हापूर ब्रेकिंग, महादेवी हत्ती परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्तावाचा आदेश, हाय पॉवर कमिटी सकारात्मक, हत्ती परत येणार का?

Suryakumar Yadav वर ICC ची कारवाई! पाकिस्तानने केलेल्या तक्रारीवर झाली सुनावणी; 'ते' विधान पडलं महागात

SCROLL FOR NEXT