नारायणगाव, ता. २२ : ‘‘पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांमध्ये लहान मुलांवरील बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. ऊस तोडणी सुरू झाल्यानंतर माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. ‘बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल करून या शाळा सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० पर्यंत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती, शाळा समितीची मंजुरी घेऊन शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घ्यावा,’ असे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (भा.प्र.से) यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे,’’ अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी एक कि. मी. व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा तीन किमी अंतराच्या आत उपलब्ध आहे. असे असली तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात व शाळा सुटल्यावर घरी जातात रस्त्यांच्या कडेने बिबटप्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, जंगल क्षेत्र, डोंगराळ क्षेत्र आहे. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्नर व शिरूर तालुक्यातील तीन मुले बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. ऊस तोडणी सुरू झाल्याने प्रामुख्याने जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव,खेड, शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असल्याचे विविध घटना वरून दिसून येत आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. बिबटप्रवण क्षेत्रातील संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती, शाळा समितीची मंजुरी घेऊन शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घ्यावा. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्व केंद्रप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
अशोक लांडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जुन्नर