नारायणगाव, ता.२२ : नगरपालिका निवडणूक आचारसंहितेचा अडसर आल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक लांबली आहे. रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा नोव्हेंबर रोजी होणारी नियोजित कालवा सल्लागार समितीची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. यामुळे लाभधारक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कुकडी पाणी नियोजनासाठी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दरवर्षी होणारी रब्बी हंगामाची बैठक लांबली आहे. यामुळे सात तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाच्या लागवड नियोजनाबाबत निर्णय घेण्यात अडचणी निर्माण झाली आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने प्रशासकीय पातळीवर कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज पिंपळगाव जोगे, डिंभे या पाच धरणांचा समावेश होतो. या धरणांना जोडलेल्या कालव्याद्वारे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यातील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामातील पिकांना सिंचन केले जाते. या भागात रब्बी हंगामात प्रामुख्याने ऊस, कांदा, गहू, ज्वारी या प्रमुख पिकांसह इतर भाजीपाला पिके घेतली जातात. सद्यःस्थितीत कांदा, ऊस लागवड व ज्वारी,गहू पिकाची पेरणी सुरू आहे. कालव्याच्या पाण्यावर सिंचन अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सद्यःस्थितीत पाण्याची गरज आहे.रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी दरवर्षी कालवा सल्लागार समितीची बैठक ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असते. डिसेंबर महिन्यात ३५ ते ४० दिवसाचे रब्बीचे आवर्तन सुरू केले जाते. नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणारी कालवा सल्लागार समितीची नियोजित बैठक अचानक रद्द करण्यात आली. कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्याने कालव्यात सोडण्यात येणाऱ्या रब्बी हंगामाच्या आवर्तनाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. नियोजन लांबल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांचे नियोजन करण्यात अडचण निर्माण झाली आहे. यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीची वाट न पाहता कुकडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन डिंभे डावा, उजवा, कुकडी डावा, पिंपळगाव जोगे, मीना शाखा आदि कालव्यात आवर्तन कधी सुरू होणार या बाबतची माहिती द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नगरपालिका आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची नियोजित बैठक रद्द झाली. यावर्षी कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रब्बी हंगामात सुमारे सहा टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे. आवर्तन नियोजन जाहीर करण्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरी मिळताच कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यात रब्बीचे आवर्तन सोडण्यात येईल.
- जे.बी.नान्नोर, कार्यकारी अभियंता : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१):
धरणनिहाय शनिवारपर्यंतचा उपयुक्त पाणी साठा
धरण ...........टीएमसी...........टक्के
येडगाव......१,९४३ ......१००
माणिकडोह......८,४८३......८३.३४
वडज......१.१७१......९९.८७
पिंपळगाव जोगे......३.६१३......९२.८६
डिंभे: ......१२.५०० ......१००
चिल्हेवाडी......०.७८२......९७.५२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.