रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. १९ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारुळवाडी परिसरात बंद सदनिका व घरफोडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यात बंद सदनिकांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अथवा खिडकीचे ग्रील तोडून सुमारे ५० तोळे सोन्याचे व १४० तोळे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली आहे. बहुतेक ठिकाणचे चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. एका चोरीचा अपवाद वगळता इतर चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
सतर्क नागरिकच सुरक्षित नागरिक
महिलांच्या गळ्यातील दागिने, शेतमाल, दुचाकीची चोरी आदी घटना वाढल्या आहेत. झालेल्या चोऱ्यांचा विचार करता बंद सदनिका व दुकानांमध्ये चोरी करण्याकडे गुन्हेगारांचा कल दिसून येत आहे. चोरीच्या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. चोरटे चोरी करताना हेल्मेट, अथवा मास्कचा वापर करतात. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊनदेखील चोरट्यांची ओळख पटवणे पोलिस तपासात अडचणीचे ठरत आहे. वाढलेल्या चोऱ्यांचा विचार करता पोलिसांवर विसंबून न राहता आपणच आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिल्यास आयुष्यभराची कमाई गमावण्याची व पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. बंद घरे व दुकानात रोख रक्कम अथवा मौल्यवान दागिने न ठेवल्यास चोरीच्या घटना टाळता येतील. याबाबत पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
चोरीच्य घटना
- १७ डिसेंबर २०२५ : वारुळवाडी येथील फळांचे व्यापारी अनिकेत डोंगरे हे घर बंद करून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दुचाकी वर आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून बंद घरात प्रवेश केला चार तोळे सोन्याचे,११६ तोळे चांदीचे दागिने व साठ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला.
- ४ डिसेंबर २०२५ : नारायणगाव येथील कोल्हे मळा परिसरातील सुविधा रेसिडेन्सी व समृद्धी रेसिडेन्सी या गृहनिर्माण सोसायटीमधील सहा सदनिकांचा दरवाजा व सेफ्टी लोखंडी दरवाजाचे कडी कोंयडा व लॉक तोडून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
- १० जुलै २०२५ : दुपारी एक ते दोनच्या दरम्यान नारायणगाव येथील दोन सदनिका व वारुळवाडी येथील नारायणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस दाम्पत्याच्या सदनिकेचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने पळविले.
- १२ ऑक्टोबर २०२५ : नारायणगाव येथील साईनाथ सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
- १५ ऑक्टोबर २०२५ : सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू सांगडे यांची घरफोडी करून १५ तोळे सोन्याचे दागिने, २५ तोळे चांदीचे दागिने, पंधरा हजार रुपये रोख, असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या चोरीचा तपास करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
- १३ फेब्रुवारी २०२५ : वारुळवाडी येथील पुणे- नाशिक महामार्गालगत असलेल्या कोठारी ऑटोव्हील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मारुती सुझुकी शोरूममध्ये चोरट्यांनी प्रवेश करून गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून तिजोरी फोडून त्यामधील सुमारे पाच लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.