न्हावरे, ता.५ आर्थिक व्यवहार सुलभ होऊन रोजगाराला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ओंकार शुगर ग्रुपचा साखर कारखाना त्या ठिकाणी अशोक नागरी सहकारी बँकेची शाखा काढण्याचा मानस असल्याची माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.
बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली. त्यानंतर बोत्रे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, ओंकार शुगर ग्रुपचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी १५ साखर कारखाने उसाचे गळीत यशस्वीपणे करत आहेत. ओंकार शुगर ग्रुप कारखान्यातील कामगार, ऊस वाहतूकदार व ऊस उत्पादक शेतकरी यांना वेळेवर रास्त पेमेंट देत आहे. त्यामुळे ओंकार शुगर ग्रुपवर दिवसेंदिवस सगळ्या घटकांचा विश्वास वाढत आहे. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टॅक्टर, तसेच कृषी सेवा कर्ज स्वरूपात मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोत्रे पाटील यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुलक्षणा धर, बँकेचे अध्यक्ष प्रकाश मथुरिया, उपाध्यक्ष यामिनी पाटील, संचालक विश्वास शितोळे, दिनेशजी दरेकर, शंकर वाघमोडे, नवनाथ फराटे, वेदिका शिलवंत,पल्लवी घाटगे, शिल्पा कुडापणे, पूजा यादव,स्वाती सोनवणे, राणी जगताप, वैभव तावरे, धनंजय धरपळकर,परेश थोरात आदी संचालक व सभासद उपस्थित होते.
02391