नीरा नरसिंहपूर, ता. २० ः बावडा (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीकडून सन २०१८ पासून निर्माण केलेल्या दलित वस्त्या व त्यांना मिळालेल्या शासकीय निधी, तसेच गावातील पाणंद रस्ते कामात तत्कालीन सरपंच किरण पाटील, विद्यमान सरपंच पल्लवी गिरमे व ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे यांच्या गैरकारभाराची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अश्वजित कांबळे यांनी कार्यालयासमोर १५ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावडा ग्रामपंचायत कार्यालयाकडून सन २०१८ ते सन २०२५ वर्षांपर्यंत ३२ दलित वस्त्या दाखवण्यात आले आहेत. त्याकरिता ग्रामविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या दलित वस्त्यांच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार व अपहार झाला आहे.
तत्कालीन सरपंच पाटील, विद्यमान सरपंच गिरमे व ग्रामविकास अधिकारी पावसे यांनी शासनाचा आलेला दलित वस्त्यांचा निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजात खर्च करण्याचे शासनाचे आदेश असताना हा निधी सन २०१८ पासून ते सन २०२५ पर्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या इतर ठिकाणी वापरला. त्याबाबत अनेकदा ग्रामसभेत लेखी अर्ज देऊनही दलित वस्त्या निधीबाबत विचारणा केली असता त्यावर कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. तसेच, ग्रामसभेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी पावसे उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. दलित वस्त्या निधीचा गैरप्रकारे इतर वॉर्डात खर्च केल्याचे आढळून येत आहे.
शासनाच्या अटी व शर्तीस छेद देऊन अनिर्बंध विशेष अधिकार वापरून संगनमताने निधीचा गैरकारभार केला आहे. तसेच, सन २०१८ पासून आजतागायत ग्रामपंचायतीकडून दलित वस्त्या व इतर कामांची चालू व पूर्ण झालेल्या कामांची काढलेली बिले व इंदापूर पंचायत समितीला कळविलेल्या निर्धारण अहवालाची संपूर्ण गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, तालुका दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनास महादेव घाडगे, पंडित पाटील, अनिल कांबळे, समाधान कांबळे, विशाल कांबळे, पांडुरंग गायकवाड, गोरख गायकवाड आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
यासंदर्भात सरपंच गिरमे व तत्कालीन सरपंच पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर ग्रामविकास अधिकारी पावसे म्हणाल्या, शासनाच्या अटी व शर्तीस अधीन राहूनच दलित वस्त्यांचे निर्माण व निधीचा विनियोग व वापर केलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.