ओतूर, ता. १८ : उदापूर (ता. जुन्नर) येथे नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह श्री काळभैरवनाथ भजन मंडळ, भैरवनाथ नगर व उदापूर ग्रामस्थ यांच्या तर्फे आयोजित केला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सुवर्णमहोत्सवी (५०) वर्ष असून या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांची सेवा या काळात झाली.
अखंड हरिनाम सप्ताह सोमवार (ता. २२) ते गुरुवार (ता. २ ऑक्टोबर) या कालावधीत होणार असून दररोज पहाटे ४ ते ६ यावेळेत काकडा भजन, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत गाथा, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते २ नेमाचे भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ महाआरती, ७ ते रात्री ९ वाजता हरीकीर्तन, रात्री ९ वाजता महाप्रसाद, १० वाजता हरिजागर असा दिनक्रम राहणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहात एकनाथ महाराज चत्तर (पारनेर), समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), अक्रुर महाराज साखरे (बीड), विशाल महाराज खोले (मुक्ताबाईनगर, जळगांव), शंकर महाराज शेवाळे (लांडेवाडी, मंचर), महादेव महाराज राऊत (बीड), बाळू महाराज गिरगावकर (गिरगाव), विलास महाराज गेजगे (परभणी), ज्ञानेश्वर महाराज कदम ऊर्फ छोटे माऊली (आळंदी देवाची), केशव महाराज ऊखळीकर (परळीवैजनाथ), विजया दशमीला (दसरा) सकाळी १० ते १२ वाजता काल्याचे हरिकीर्तन पोपट महाराज कासारखेडकर (जळगांव) यांचे होणार आहे. भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काळभैरवनाथ भजन मंडळ, ग्रामस्थांनी केले आहे.