कवठे येमाई, ता. ५ : तालुक्यातील बेट भागात दोन दिवस चोरट्यांचा सुळसुळाट आहे. कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात चार वेगवेगळ्या चोरी आणि लूटमारीच्या घटना घडल्या असून यामध्ये सुमारे तीन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पंधरा लहान मोठ्या शेळ्या चोरून नेल्या आहेत. यावेळी चोरट्यांनी दाम्पत्याला मारहाण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कवठे येमाई (माळवदेवस्ती) येथे शनिवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास पुर्णाबाई पडवळ (वय ७७) या गुरे चरण्यासाठी घेऊन जाताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बदाम आणि कर्णफुले हिसकावले. पुर्णाबाईंनी आरडाओरडा करत प्रतिकार केला असता चोरट्यांनी पळ काढला. त्याच दिवशी पाच वाजण्याच्या सुमारास सविंदणे येथेही अशीच घटना घडली. सीताबाई पोखरकर या रस्त्याच्या कडेला बसल्या असताना दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्याच रात्री पुन्हा कवठे येमाई येथील ढाकीवस्ती जवळील नाथा वागदरे यांच्या घरात चोरट्यांनी थेट घुसखोरी करत हल्ला केला. वागदरे दाम्पत्याला मारहाण करत दोरीने बांधून ठेवत चोरट्यांनी ११ शेळ्या, चार करडे आणि रोख रक्कम लंपास केली. यात लीला वागदरे यांना डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देत पाहणी केली.
रविवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टाकळी हाजी गावातील कुंड रस्त्यावर पुन्हा एकदा चोरट्यांनी दुचाकीवरून येत ताराबाई मंदिलकर या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. या सलग घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे तालुक्यातील बेट भागात चोरट्यांची दहशत वाढली आहे. या घटनांबाबत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.