फुलवडे, ता. १२ : आहुपे (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवार (ता. ५) व बुधवारी (ता. १०) गणित-भूमिती कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत पाचवी ते दहावीच्या २१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी धन आणि ऋण संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे आणि पाढा तयार करणे या विषयांवर संकल्पना सादर केल्या. तसेच नववी व दहावी वर्गासाठी गणितातील त्रिकोणमितीच्या संकल्पना, साइन, कोसाइन, टॅन यासारख्या किमतींचा टेबल ट्रिकद्वारे तयार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला. भूमिती विषयात बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, त्रिज्या, व्यास यांसारख्या मूळ भूमितीच्या संकल्पनांवर चर्चा केली.
कार्यशाळेसाठी अजय आवटे यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश हुले, अधीक्षक लक्ष्मण मगर, दिलीप भागीत, आणि शाश्वत संस्थेचे विश्वस्त प्रतिभा तांबे, सुलोचना गवारी, शांताराम गुंजाळ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आर्थिक साहाय्य संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राजवाडे यांनी केले.