पिंपळवंडी, ता. १२ : चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी सचिन खंडू चाळक यांच्या कुत्र्याला ऋषी बोडके या तरुणाने बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले.
चाळकवाडी येथे मंगळवारी (ता. ११) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या सहा फुटी कुंपणावरून उडी मारत घरासमोर असलेल्या कुत्र्याला घेऊन गेला. ते अनुज चाळक याने पाहिले. याबाबत त्याने ऋषी बोडके याला सांगितले. त्यावर ऋषी याने बिबट्याचा पाठलाग केला व उसात असलेल्या बिबट्याला आरडाओरडा करत हुसकाविले. त्यावेळी कुत्र्याला सोडून बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कुत्र्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहिले असता बिबट्याच्या पाऊलखुणा त्यांना दिसल्या. तसेच, पुन्हा एकदा बिबट्या त्याठिकाणी आलेला त्यांनी पाहिला. मात्र, वनविभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन केले की, बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना घेऊन जात असताना बिबट्याचा पाठलाग कोणीही करू नये. त्यामुळे बिबट्या चिडून तो माणसावर हल्ला करू शकतो. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाला याची माहिती द्यावी.