पिंपरी, ता. २३ ः पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यात आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) प्लॅन्टमुळे भर पडत आहे. बांधकाम साहित्याच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर उडणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. परिणामी हवेची गुणवत्ताही ढासळली आहे. यावर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हिंजवडीमध्ये आयटी कंपन्यांबरोबरच अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. अनेक नवीन इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या आरएमसी प्लॅन्टची संख्या वाढत आहे. अनेक आरएमसी प्लॅन्ट सोसायट्यांच्या जवळच आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धूळीशिवाय आवाजाचाही त्रास होतो.
हिंजवडी भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यातून खडी आणि माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळेही हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सर्दी खोकला व दमा अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे.
नियमावली कडक, मात्र कारवाई नाही
प्रदूषण टाळण्यासाठी आरएमसी प्लॅन्ट चालकांसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले नवीन नियम कडक आहेत. त्यामध्ये आरएमसी प्लॅन्ट चारी बाजूने बंद करणे, धूळ उडू नये यासाठी स्प्रिंकलर बसवणे, बाहेर जाणाऱ्या गाड्यांची चाके स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभारणे अशा नियमांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात परिपत्रक काढूनही या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी अधिकारी कुठेही फिरकलेले नाहीत. त्यामुळे हे नियम पाळले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. आरएमसी प्लॅन्ट चालकांनी नियम पाळावेत यासाठी कठोर कारवाई करावी तसेच प्रदूषण करणाऱ्या आणि बेकायदेशीर आरएमसी प्लॅन्टवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
---
हिंजवडी फेज ३ भागात तसेच विशेषतः आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामध्ये आरएमसी प्लॅन्टची वाढलेली संख्या, मेट्रोचे सुरू असलेले काम, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उडणारी धूळ व अवजड वाहने कारणीभूत आहेत. त्यामुळे पीएम २.५, पीएम १० या धुलीकणांमुळे होणारे प्रदूषण वाढत आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्याही पुढे गेला आहे. याची तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
- नरेश सोनावणे, रहिवासी, मेगापोलिस
---
प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई नाही
हिंजवडी, माण या भागातील प्रदूषणाबाबत रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केली आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक व कॅप्टिव्ह आरएमसी प्लॅन्टसाठी नवीन नियमावली लागू केली होती. या नियमावलीचे पालन १७ नोव्हेंबरपर्यंत होणे अपेक्षित होते. प्लॅन्ट चालकांनी अपेक्षित बदल केले आहेत का याची एका महिन्यानंतरही तपासणी झालेली दिसत नाही. अन्यथा प्रदूषण वाढले नसते असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
----