पुणे

एसटी अधिकाऱ्याने बदली ठरविली रदबदली

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ ः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच बदलीच्या आदेशाला आणि त्याआधी कारवाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगारातील दोन अधिकाऱ्यांनी दाद लागू दिलेली नाही. यातील एका महिला अधिकाऱ्याने तर वल्लभनगर आगारात बदली करून घेतली, तर दुसरा अधिकारी चालढकल करून अखेर बदलीच्या ठिकाणी रुजू झाला.
या आगारात २५ फेब्रुवारीला एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर विविध सामाजिक संस्थांनी आगारात आंदोलने केली. विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आगाराची पाहणी करून महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते. त्यामुळे सरनाईक यांनी दखल घेऊन एसटी महामंडळाला विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत हयगय केल्याप्रकरणी २२ सुरक्षारक्षक, दोन स्थानक प्रमुख, दोन आगार व्यवस्थापक यांना निलंबित करण्यात आले होते.
यात आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) जयेश पाटील आणि आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) पल्लवी पाटील यांचा समावेश होता. या दोघांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच रुजू करून घेण्यात आले आणि आधीच्या पदाचा कार्यभार देण्यात आला.
त्यानंतर सरनाईक यांनी १५ सप्टेंबर रोजी या आगाराला भेट दिली. त्यावेळी हे दोन्ही अधिकारी आगारातच कामावर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विधिमंडळातून कारवाईचे आदेश येऊनही एसटी प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांचे ऐकत नाहीत का, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.
त्यानंतर या दोघांच्या बदलीचे आदेश रात्रीतून निघाले. जयेश यांची भिवंडीला, तर पल्लवी यांची पल्लवी यांची अक्कलकोटला बदली करण्यात आली. जयेश यांनी भिवंडी आगाराचा पदभार स्वीकारला, मात्र पल्लवी यांनी अक्कलकोटचा पदभार न स्वीकारता पुण्यातच बदली करून घेण्यासाठी वरिष्ठांकडे प्रयत्न केला. त्यांच्यासाठी तीन ऑक्टोबर रोजी वल्लभनगर आगाराचे आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांची तळेगाव आगारात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांनी शनिवारी (ता. ४) वल्लभनगर आगाराचा पदभारही स्वीकारला.
या प्रकरणानंतर पल्लवी यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
---------
पल्लवी पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे विनंती केल्यानंतर त्यांची बदली पुण्यातच वल्लभनगर आगारात करण्यात आली आहे.
- अमृता ताम्हणकर, प्रादेशिक व्यवस्थापक
---

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT