सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ ः पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल काही दिवसांपासून उशिराने धावत आहेत. त्यामुळे रोज पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांचा अनेकदा ‘लेट मार्क’ लागतो. याशिवाय शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनाही उशीर होतो. त्यामुळे लोकलचे परिचालन वेळेत व्हावे, अशी मागणी प्रवाशांची मागणी आहे.
दिवाळी आणि छठ पुजेनिमित्त रेल्वे प्रशासनाने जादा एक्स्प्रेस गाड्या सोडल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या पुण्यामार्गे जात आहेत. पुणे ते लोणावळा दरम्यान केवळ दोनच ट्रॅक आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा लोहमार्ग व्यस्त आहे. जादा गाड्यांचा पुणे-लोणावळा लोकल सेवेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुण्यातून रोज सरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी लोणावळ्याला जातात.
पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ८:०५ वाजता लोकल सुटते. सर्व थांबे घेत निर्धारित वेळेनुसार सकाळी ९:२५ वाजता ती लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचते. सकाळी दहाच्या आत ती लोणावळ्यात पोहोचते. त्यामुळे लोणावळ्याला कामानिमित्त रोज प्रवास करणारे प्रवासी ही लोकल पकडतात. गेल्या काही दिवसांपासून लोकल ‘साइड ट्रॅक’ला काढून एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. लोकलचा वेगही कमी असतो. सततच्या ‘लेट मार्क’मुळे रजा लागणे, वेतन कापले जाणे, कामावर हजर करून न घेतले जाणे अशा कारणांमुळे नोकरदार वर्गाला फटका बसत आहे.
--------------
सकाळी पुण्यातून लोणावळ्याला जाणारी लोकल (क्र. ९९८१०) बऱ्याच ठिकाणी थांबवून ठेवतात. त्यामुळे लोणावळ्याला पोहोचायला उशीर होतो. त्यातून ‘लेट मार्क’ लागतो. एक्स्प्रेस पुढे जावी म्हणून लोकल थांबवली जाते. अशावेळी लोकलच्या प्रवाशांनी काय करायचे ?
- अनिकेत मोहिते, प्रवासी
--------
चिंचवड रेल्वे स्थानकावर लोकल वेळेवर येत नाही. आली तरी ती चिंचवड, तळेगाव किंवा मळवली यापैकी एखाद्या स्थानकावर किंवा प्रत्येक ठिकाणी थांबवली जाते. लोणावळ्याला जाईपर्यंत लोकलला २५ ते ३० मिनिटे उशीर झालेला असतो. आठवड्यातून पाच दिवस तरी या लोकलला उशीर होतो.
- शैलेश रानडे, प्रवासी
---------
लोकल ट्रेनला कधीतरी सात ते आठ मिनीटे उशीर होतो. दोन ते तीन वेळा तांत्रिक कारणांमुळे थोडा जास्त उशीर झाला होता, पण प्रशासनाचा गाड्या नेहमीच वेळेवर सोडण्याचा प्रयत्न असतो.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
-----