पुणे, ता. १३ : रब्बी हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) ३६९ कोटी ८८ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. परिणामी शेतकरी कर्ज घेण्याकडे वळले आहेत.
बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज दिले जाते. तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अकरा टक्के व्याजदर आकारण्यात येतो. गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या उद्दिष्टामध्येही वाढ केली आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे उद्दिष्ट मागील वर्षी होते. त्यामध्ये आत्तापर्यंत २८ हजार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज दिले होते. यावर्षी त्यात वाढ करून उद्दिष्ट हे ६८९ कोटी ३२ लाख एवढे ठेवले आहे. रब्बी हंगामात आंबेगाव, भोर, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यातील पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
पुढील पिकांसाठी भांडवलच नाही
पीक कर्जाबाबत पणदरे येथील विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अरविंद जगताप म्हणाले की, खरीप हंगामाचे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पुढील पिकांसाठी भांडवल राहिले नाही. म्हणून कर्ज काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तर काही शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असल्याने पुन्हा कर्ज देता येत नाही.’’
दृष्टिक्षेपात कर्ज
- रब्बी हंगामासाठी ३१ मार्चपर्यंत बँकेकडून कर्ज
- बँकेकडून तीनशे शाखांमधून एक हजार ३०६ सोसायट्यांना कर्ज
- सोसायट्यांकडून शेतकरी सभासदांना कर्ज
- रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी, करडई पिकांसाठी कर्जाचा उपयोग
शेतकरी कर्ज घेतो, पण पिकांना योग्य किंमत मिळत नसल्याने कर्जाची परतफेड करणे अवघड होते. खतांचे, बियाण्यांचे दर वाढले, मात्र पिकांचे बाजारभाव स्थिर आहेत. त्याचबरोबर मजुरीही वाढली. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. सरकार कर्ज माफीच्या घोषणा करते, त्यामुळे शेतकरी पण त्या भरवशावर जास्तीचे कर्ज घेतो. रब्बी हंगामासाठी बँकेकडून कर्ज घेतले आहे.
- विजय शिंदे, शेतकरी, काटेवाडी
पीककर्जाची मागणी ज्याप्रमाणात होईल, तेवढे बँकेकडून कर्जवाटप केले जात आहे. त्याप्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. यावर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप होईल, असा आमचा अंदाज आहे.
- डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पीडीसीसी
तालुकानिहाय रब्बी हंगामातील कर्जवाटप...
तालुका -- सभासद शेतकरी -- कर्ज वाटप
आंबेगाव -- ११ हजार ५२० -- ७९ कोटी ७१ लाख
बारामती -- ७५३ -- ७ कोटी ९६ लाख
भोर -- ३ हजार १०० -- २२ कोटी २४ लाख
दौंड -- ३९३ -- ५ कोटी ६२ लाख
हवेली -- ७९९ -- ६ कोटी ७१ लाख
इंदापूर -- १ हजार १२ -- १६ कोटी ७५ लाख
जुन्नर -- ११ हजार ६२० -- ७८ कोटी ९ लाख
खेड -- ११ हजार ७११ -- ७१ कोटी २ लाख
मावळ -- १ हजार ८२२ -- १२ कोटी ८० लाख
मुळशी -- २ हजार ८३४ -- १८ कोटी ४१ लाख
पुरंदर -- ४ हजार १८२ -- ३५ कोटी ८२ लाख
शिरूर -- ६८५ -- ८ कोटी ९८ लाख
राजगड -- ९६९ -- ५ कोटी ७२ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.