पुणे, ता. ८ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)तर्फे आणि सकाळ मध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या महासंग्रामाला सोमवारी (ता.८) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पुणेरी बाप्पा, डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमी यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजयी सलामी दिली. डी.वाय.पाटीलचा अथर्व धर्माधिकारी याने नाबाद १७१ धावांची तुफानी खेळी केली.
नेहरु स्टेडियम येथे पुणेरी बाप्पा आणि जेट्स सिंथेसिस यांच्यात पहिला सामना झाला. नाणेफेक जिंकून पुणेरी बाप्पा संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीवीर संग्राम भालेकर आणि सत्यजीत बच्छाव यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. संग्रामने १०७ चेंडूत १७ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी पुणेरी बाप्पासमोर ५० षटकांत २८७ धावांचे आव्हान असताना सलामी जोडी पहिल्या तीन षटकांतच तंबूत परतली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज ऋषिकेश सोनावणे आणि कर्णधार नौशाद शेख यांनी संघाचा डाव सावरताना १३८ चेंडूंत १५४ धावांची निर्णायक भागीदारी केली आणि पुणेरी बाप्पाने हा सामना पाच विकेटने जिंकला. १२७ धावांची खेळी करणारा ऋषिकेश सोनावणे हा सामनावीर ठरला.
लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर झालेला कपिल सन्स विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी हा दुसरा सामना एकतर्फी झाला. पुनीत बालन क्रिकेट अकादमीने ४४.५ षटकांत केवळ १९० धावांवर कपिल सन्सचा डाव गुंडाळला. शुभम मैड याने तीन तर रजनीश गुरुबाणीने दोन विकेट घेतल्या. पवन शाहच्या नाबाद १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर पुनीत बालन क्रिकेट अकादमीने हा सामना ३९.१ षटकांत सात गडी राखून जिंकला. पवन हाच सामनावीर ठरला.
येवलेवाडी येथील ब्रिलियंट अकादमीच्या मैदानावर स्पर्धेतील तिसरा सामना झाला. त्यात प्रथम फलंदाजी करत डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर संघाने सलामीवीर अथर्व धर्माधिकारीच्या नाबाद १७१ धावांच्या खेळी जोरावर ५० षटकांत तब्बल ३२९ धावांचा डोंगर उभा केला. अथर्व याने १४३ चेंडूत ४ षटकार आणि २१ चौकारांच्या मदतीने ही तुफानी खेळी केली.
आव्हानाचा पाठलाग करताना ईगल व्हॅलेन्टिनाचा संघाचा डाव ४४.१ षटकांत २६१ धावांवर आटोपला आणि डी.वाय.पाटील संघाने सामना ६८ धावांनी जिंकला. ईगल व्हॅलेन्टिनाच्या ओम भोसलेचे शतक निष्फळ ठरले, तर नाबाद १७१ धावांच्या तुफानी खेळीसाठी अथर्वला सामनावीराचा बहुमान मिळाला.
----------
संक्षिप्त धावफलक
जेट्स सिंथेसिस ः ४८.२ षटकांत सर्वबाद २८३ (संग्राम भालेकर ११९, किरण चोरमले ४९, सत्यजित बच्छाव ४७, अभिषेक पवार ३३, सचिन भोसले ४-४९, सागर जाधव ३-३९, अब्दुस सलाम १-४१) पराभूत विरुद्ध पुणेरी बाप्पा ः ४२ षटकांत ५ बाद २६५ (ऋषिकेश सोनावणे नाबाद १२७, नौशाद शेख ९४, सूरज शिंदे ३४, निकित धुमाळ २-६२, किरण चोरमले १-३३).
कपिल सन्स ः ४४.५ षटकांत सर्वबाद १९० (अथर्व काळे ३९, सिद्धेश वीर ३८, नदीम शेख २०, शुभम मैड ३-३३, रजनीश गुरबाणी २-२२, संकेत यशवंते १-२३) पराभूत विरुद्ध ः पुनीत बालन क्रिकेट अकादमी ः ३९.१ षटकांत ३ बाद १९१ (पवन शहा नाबाद १०४, सचिन धस ३४, अंकित बावणे नाबाद १७).
डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर ः ५० षटकांत ६ बाद ३२९ (अथर्व धर्माधिकारी नाबाद १७१, अनिरुद्ध साबळे ३८, दिग्विजय पाटील ३७, रोहन दामले २- ४०) वि.वि. ईगल व्हॅलेन्टिना ः ४४.१ षटकांत सर्वबाद २६१ (ओम भोसले १०१, मेहुल पटेल ३४, सुहेल श्रीखंडे ३८, सोहन जमाले ३-४८, हर्षल काटे २-४७).
चौकट
पहिल्याच दिवशी पाच शतके
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फलंदाजांनी एकूण पाच शतके झळकविली. डी.वाय.पाटीलचा अथर्व धर्माधिकारी, पुणेरी बाप्पाचा
ऋषिकेश सोनावणे आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमीचा पवन शाह यांनी शतकी खेळी करत आपापल्या संघांना विजय मिळवून दिला. मात्र, जेट्स सिंथेसिसचा संग्राम भालेकर अणि ईगल व्हॅलेन्टिनाच्या ओम भोसलेचे शतक निष्फळ राहिले.
पुणेरी बाप्पाच्या गोलंदाजांनीही भेदक मारा केला. सचिन भोसलेने चार विकेट तर सागर जाधव याने तीन विकेट घेतल्या.
डी.वाय.पाटीलचा सोहम जामले आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमीच्या शुभम मैड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
आज होणारे सामने
सामने ः स्थळ
पुणेरी बाप्पा विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी - नेहरू स्टेडिअम (स्वारगेट)
डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर विरुद्ध कपिल सन्स - ब्रिलियंट अकादमी (येवलेवाडी)
जेट्स सिंथेसिस विरुद्ध ईगल व्हॅलेन्टिना - सिंहगड महाविद्यालय (लोणावळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.