पुणे, ता. १५ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुनीत बालन क्रिकेट अकादमीने डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर (सी.सी) संघाला पाच विकेटने आणि कपिल सन्सने पुणेरी बाप्पा संघाचा ६० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. या दोन्ही संघांत आता उद्या मंगळवारी (ता.१६) रंगणार आहे.
स्वारगेट येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे अंतिम सामना होणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने झाले. त्यामध्ये साखळी फेरीत एकही सामना पराभूत न झालेल्या पुनीत बालन क्रिकेट अकादमी आणि डी.वाय.पाटील सी.सी. यांच्यात नेहरू स्टेडियम येथे पहिला सामना रंगला. नाणेफेक जिंकून पुनीत बालन अकादमीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अकादमीचे वेगवान गोलंदाज वैभव दारकुंडे आणि रजनीश गुरबानी यांनी सकाळच्या मंद वाऱ्याचा फायदा घेतला आणि चेंडू अचूक टप्प्यावर ठेवला. सर्वप्रथम वैभव याने अनिरुद्ध साबळे याला आणि नंतर रजनीश याने दिग्विजय पाटील याला तंबूत परत पाठवत ‘पॉवर प्ले’मध्ये धावगतीला लगाम लावला.
अथर्व, क्रिशची लढत
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या अथर्व धर्माधिकारी याने पूर्वीप्रमाणे संघाच्या फलंदाजीचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. अगोदर हर्षल काटे आणि त्यानंतर कर्णधार सौरभ नवले याच्यासोबत त्याने अर्धशतकीय भागीदारी करत धावगतीला चालना दिली. मात्र, ८८ धावा करून अथर्व बाद झाला आणि धावगतीला चाप बसला. परंतु, ३६ षटकांच्या अखेरीस धावसंख्या सहा बाद १८० धावा असता क्रिश शहापूरकर याने तळाच्या फळीतील फलंदाजांबरोबर भागीदारी केली. क्रिश यानेही संयमी अर्धशतकीय खेळी केली. परंतु, इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू न शकल्याने डी.वाय.पाटील. सी.सी. संघाचा डाव ४६.२ षटकांत २४८ धावांवर आटोपला.
सचिन, राहुलने सांभाळली धुरा
पुनीत बालन क्रिकेट अकादमीची सुरुवात देखील खडतरच झाली. सलामी जोडी लवकर तंबूत परतली. तर मधल्या फळीतील दिग्विजय पाटील आणि कर्णधार अंकित बावणे लवकर बाद झाले. मात्र, भारतीय संघामधून आणि ‘आयपीएल’ खेळलेल्या राहुल त्रिपाठी याने विचलित न होता शांतपणे धावांचा पाठलाग केला. सचिन धस याने शतक झळकाविले. तर राहुल याने नाबाद अर्धशतकीय आणि सिद्धार्थ म्हात्रे याने नाबाद २९ धावा करत संघाला पाच विकेट शिल्लक राहिल्या असताना विजय मिळवून दिला.
सिद्धेश-विक्कीची भागीदारी
येवलेवाडी येथील ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी येथे झालेला कपिल सन्स विरुद्ध पुणेरी बाप्पा हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी झाला. मैदानावर पाणी असल्याने सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ३५ षटकांचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करतना कपिल सन्स संघाची सलामीची जोडी धावफलकाला फार हलता न ठेवता लवकरच बाद झाली. मात्र, कर्णधार सिद्धेश वीर आणि विक्की ओत्सवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत १२६ धावांची तुफानी भागीदारी केली. सिद्धेशने शतक तर विक्कीने अर्धशतक झळकाविले. त्यानंतर आलेल्या नीरज जोशी आणि अनुराग कवडे यांनी देखील अर्धशतकीय खेळी केली आणि पुणेरी बाप्पा समोर ३५ षटकांत ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले.
सलामीवीर यश नहार वगळता पुणेरी बाप्पाच्या वरच्या फळीतील फलंदाजांची कपिल सन्सच्या गोलंदाजांनी दैना उडविली. अर्शिन कुलकर्णी याने पाच विकेट घेतल्या. खालच्या फळीतील सूरज शिंदे आणि रवींद्र जाधव यांनी सातव्या विकेटसाठी ६६ चेंडूत ९९ धावांची वेगवान भागीदारी केली. मात्र, ते दोघेही बाद झाल्यानंतर पुणेरी बाप्पाला धावगती वाढवता आली नाही आणि २९० धावांवर ते सर्वबाद झाले. कपिल सन्स यांनी सामना ६० धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक
(३५ षटकांचा सामना) कपिल सन्स : ३५ षटकांत ९ बाद ३५० (सिद्धेश वीर १०४, अनुराग कवडे नाबाद ७४, विकी ओत्सवाल ६१, नीरज जोशी ५३, सव्या गजराज ३४, रामकृष्ण घोष ५-५६, सागर जाधव २-५४, दीपक डांगी १-२९, हितेश वाळुंज १-४६). विजयी विरुद्ध पुणेरी बाप्पा ः ३३.१ षटकांत सर्वबाद २९० (सूरज शिंदे ९२, रवींद्र जाधव ६६, यश नहार ५६, अर्शिन कुलकर्णी ५-६०, तनय संघवी २-७४, सिद्धेश वीर १-२०, विक्की ओत्सवाल १-३८, सव्या गजराज १-४४).
डी.वाय. पाटील सी. सी ः ४६.२ षटकांत सर्वबाद २४८ (अथर्व धर्माधिकारी ८८, क्रिश शहापूरकर ६९, हर्षल काटे २२, अनिरुद्ध साबळे २०, वैभव दारकुंडे ३-४०, रजनीश गुरबानी ३-४४, सिद्धार्थ म्हात्रे २-३५, राहुल त्रिपाठी १-२७, शुभम मैड १-४४). पराभूत विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी ः ४८.४ षटकांत ५ बाद २४९ (सचिन धस ११०, राहुल त्रिपाठी नाबाद ५२, सिद्धार्थ म्हात्रे नाबाद २९, अंकित बावणे २२, वैभव गोसावी २-६१, ओंकार मोहिते १-३०, सईद इझान १-५१, काझी शमशूझामा १-६०).
चौकट
- कपिल सन्स संघाचा कर्णधार सिद्धेश वीर याने पुणेरी बाप्पा विरुद्ध ६४ चेंडूत १०४ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यामध्ये त्याने सात षटकार आणि आठ चौकार मारले. तर गोलंदाजी करताना त्याने एक विकेट सुद्धा घेतली. त्यामुळे अष्टपैलू खेळीसाठी सिद्धेश हा सामनावीर ठरला.
- पुनीत बालन क्रिकेट अकादमी संघाच्या सचिन धस याने डी.वाय.पाटील सी.सी विरुद्ध १२७ चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने ११० धावांची सावध खेळी केली. निर्णायक खेळीसाठी सचिन धस याला सामनावीराचा बहुमान मिळाला. पुणेरी बाप्पाच्या रामकृष्ण घोष आणि कपिल सन्सच्या अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या.
आज होणारी अंतिम लढत
पुनीत बालन क्रिकेट अकादमी विरुद्ध कपिल सन्स ः नेहरू स्टेडियम, स्वारगिट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.