पुणे

चालकांना प्रशिक्षण मिळूनही ‘पीएमपी’बसचे अपघात वाढले

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचे वाढते अपघात लक्षात घेता प्रशासनाने ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेमार्फत (आयडीटीआर) स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसच्या चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार चालकांना प्रशिक्षण मिळाले आहे. यावर प्रति चालक एक हजार ४०० रुपयांनुसार ४८ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. यानंतरही जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ‘पीएमपी’ बसचे ४५ अपघात झाले आहेत. यात २४ जणांचा मृत्यू आणि १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
‘पीएमपी’ पुणे, पिंपरी चिंचवडबरोबरच ग्रामीण भागातील पीएमआरडीएच्या हद्दीत रोज १७०० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देते. सरासरी १० लाखांवर प्रवासी प्रवास करतात. ‘पीएमपी’च्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसचा समावेश आहे. सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने बस चालवणे, बस चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशाप्रकारे ‘पीएमपी’ चालक विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे ‘पीएमपी’ बसचे अपघातही वाढत आहेत. यात जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे.
मुंबईतील कुर्ला येथे १० डिसेंबर रोजी बेस्ट बसच्या अपघातामुळे मुंबई हादरली. भरधाव बस कुर्ल्यातील रहदारीच्या रस्त्यावर घुसली आणि त्याखाली चिरडून सात जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल ४२ पेक्षा जास्त जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर ‘पीएमपी’ प्रशासनाने चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेशी (सीआयआरटी) संलग्न आयडीटीआर संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येते. सहा जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु झाला. रोज ५० चालकांच्या एका तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले.

प्रशिक्षणावर प्रश्‍नचिन्ह
चालकांना दोन दिवस विशेष प्रशिक्षण मिळूनही अपघात कमी झाले नाहीत. उलट मागील वर्षीच्या तुलनेत वाढच झाली. यंदा १५ डिसेंबरपर्यंतही प्राणांतिक अपघात झाल्याने आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण मिळूनही चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. प्रशिक्षण दिल्यानंतरही जर चालक वाहतूक नियमांचे पालन करत नसतील आणि प्राणांतिक अपघात कमी होत नसतील तर या प्रशिक्षणाचा उपयोग काय, प्रशिक्षणाचा दर्जा काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
-------------
काय होते प्रशिक्षणात ?
रोज सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ सत्रांत प्रशिक्षण दिले जाते. यात रस्ते सुरक्षा, मोटार वाहन कायद्यातील तरतुदी, वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारवाईच्या तरतुदी, सीएनजी आणि इलेक्ट्रीक बसचे परिचालन, तणाव व्यवस्थापन आणि मन:शांती, योगासने आणि व्यायाम, अपघातानंतर प्रथमोपचार यासह इतर तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.
-------
आकडे बोलतात
स्वमालकीच्या बसचे चालक - १,९४७
ठेकेदारांच्या बसचे चालक - १,४८४
एकूण चालकांना प्रशिक्षण - ३,४३१
प्रति चालक खर्च - १,४०० रुपये
एकूण खर्च - ४८,०३,४००
---------
वर्ष ः अपघात ः मृत्यू ः जखमी
२०२४ ः ३८ ः २८ ः ५१
नोव्हेंबर २०२५ पर्यंत ः ४५ ः २४ ः १७
-----------
जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बस चालकांना आयडीटीआरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. ठेकेदारांच्या बस चालकांच्या प्रशिक्षणाचा खर्च त्यांच्या बिलातून वजा केला जातो. प्रति चालक १,४०० रुपये खर्च झाला आहे.
- किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT