पुणे

शिवराज स्पोर्टस, विघ्नहर्ता, अमरभाऊ काटे स्पोर्टस उपांत्यपूर्व फेरीत

CD

पिंपरी, ता.२० ः सकाळ माध्यम समुहाच्यावतीने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये शनिवारी (ता.२०) साखळी फेरीत शिवराज स्पोर्टस संघाने सलग दोन विजय मिळविले. ओंकार ढवळे, दिलीप वर्मा यांनी झंझावती अर्धशतके झळकाविली. शिवराज स्पोर्टससह विघ्नहर्ता, अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशन संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


चॅलेंजर्स बॉईजची विजयी सलामी
दिवसभरातील पहिल्या सामन्यात चॅलेंजर्स बॉईज संघाने रुद्रांश इलेव्हनवर ९ विकेट राखून मात केली. ऋषिकेश धोटे सामन्याचा मानकरी ठरला.
कीर्तनकार बाळू वाघेरे यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. चॅलेंजर्स बॉईज संघाचा कर्णधार बिपीन साकोरे याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. रुद्रांश इलेव्हन संघाने ७ षटकांत ५ बाद ६६ धावा केल्या. सर्फराज पठाण याने १३ चेंडूंत २६ धावा केल्या. याखेरीज, विशाल डेपा १५, किरण सेंडा १०, स्वप्नील पिसाळ ८ यांनीही आपापल्या परीने योगदान दिले. चॅलेंजर्स बॉईज संघाने रुद्रांश इलेव्हनचे आव्हान ५.१ षटकांत १ विकेटच्या बदल्यात सहज मोडून काढले. ऋषिकेश धोटे याने १९ चेंडूंत नाबाद ३५, तर मंगेश याने ५ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या. शमशुद्दीन यानेही १३ धावा केल्या. विजयी संघाकडून अनिल मोरे याने २, बी.भागवत, संदीप धुवान यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.

ओंकारचे घणाघाती अर्धशतक
शिवराज स्पोर्टस क्लबने शरयू स्पोर्टस संघावर दुसऱ्या सामन्यात ४० धावांनी मात केली. अर्धशतकवीर ओंकार ढवळे सामन्याचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून शरयू स्पोर्टस संघाचा कर्णधार योगेश वाळुंज याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. शिवराज स्पोर्टसने ओंकार ढवळे याच्या २३ चेंडूंतील ५६ धावांच्या जोरावर ७ षटकांत ५ बाद ८१ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना शरयू स्पोर्टसचा डाव ७ षटकांत ५ बाद ४१ धावांवरच आटोपला. योगेश वाळुंज याने १४ धावा केल्या. शरयू कडून ज्ञानेश्वर याने १८ धावा देत ३ विकेट घेतल्या. तर विजयी संघाकडून ज्ञानेश्वर मुळीक आणि ललित भालेराव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

‘शिवराज’चा सलग दुसरा विजय
शिवराज स्पोर्टस क्लब संघाने तिसऱ्या सामन्यात चॅलेंजर्स बॉईजवर २४ धावांनी मात करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पंकज कोंडे सामन्याचा मानकरी ठरला.
शिवराज स्पोर्ट्सचा कर्णधार संदीप जाधव याने फलंदाजीचा निर्णय घेतला. पंकज कोंडेच्या १२ चेंडूंत नाबाद २८ आणि श्रीकांत नवल याच्या ९ चेंडूंत नाबाद १८ धावांच्या जोरावर संघाने ६ षटकांत ४ बाद ७२ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, चॅलेंजर्स बॉईजचा संघ ४ बाद ४८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. ऋषिकेश धोटे याने २० चेंडूंत ३७ धावा केल्या. विजयी संघाकडून अमीर शेख, ललित भालेराव, ज्ञानेश्वर मुळीक यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.


योगेशच्या अष्टपैलू खेळीने विजय
शरयू स्पोर्टस क्लबने चौथ्या सामन्यात रुद्रांश इलेव्हनवर ७ विकेट राखून मात केली. अष्टपैलू खेळीबद्दल विजयी संघाचा कर्णधार योगेश वाळुंज सामन्याचा मानकरी ठरला.
रुद्रांश इलेव्हन संघाने ६ षटकांत ९ बाद ३८ धावा केल्या. सर्फराज पठाण याने १४, किशोर साखरे याने १० धावा केल्या. शरयू स्पोर्टस क्लबने हे माफक आव्हान ४.५ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार योगेश वाळुंजने १४ चेंडूंत २१ धावा केल्या. विजयी संघाच्या साजीद याने ४ तर योगेश वाळुंज याने २ विकेट घेतल्या. पराभूत संघाकडून मोहित याने २ विकेट घेतल्या.

सौरव सोमवंशीची तडाखेबंद खेळी
शरयू स्पोर्टस संघाने पाचव्या सामन्यात सौरव सोमवंशीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर ५ विकेट राखून चॅलेंजर बॉईजवर मात केली. सौरव सोमवंशी याला सामनावीराचा किताब बहाल करण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना चॅलेंजर बॉईज संघाने ६ षटकांत १ बाद ७०
धावा केल्या. त्यामध्ये मंगेश याच्या २० चेंडूंत नाबाद ४१ धावांचे मोलाचे योगदान राहिले. विजयासाठी ७१ धावांची गरज असताना शरयू स्पोर्टस संघाने २ चेंडू आणि ५ विकेट राखून पूर्ण केले. सौरव सोमवंशीबरोबरच सागर भोसले याने ६ चेंडूंत १८ धावांचीही मोलाची भर घातली. सागर भोसले याने एक विकेटही घेतली. पराभूत संघाकडून शान याने २ विकेट घेतल्या.

पंकज कोंडेची सुरेख फलंदाजी
शिवराज स्पोर्टस क्लबने पंकज कोंडे याची फलंदाजी आणि ज्ञानेश्वर मुळीकच्या गोलंदाजीच्या जोरावर शरयू स्पोर्टस संघाचा ४४ धावांनी दणदणीत पराभव केला. पंकज कोंडे सामन्याचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना शिवराज स्पोर्टस संघाने ६ षटकांत ४ बाद ७५ धावा केल्या. त्यात पंकजच्या २७, श्रीकांत नवलच्या नाबाद १९, ललित भालेराव याच्या १४ धावांचे योगदान राहिले. धावसंख्येचा पाठलाग करताना शरयू स्पोर्टस संघाला ४ विकेटच्या बदल्यात केवळ ३१ धावाच करता आल्या. त्यात सागर भोसलेच्या नाबाद १७ धावांचा समावेश होता. विजयी संघाच्या ज्ञानेश्वर मुळीक याने २ विकेट घेतल्या.


काल झालेले सामने
विघ्नहर्ता इलेव्हन संघाने प्रहार इलेव्हनवर शुक्रवारी झालेल्या सहाव्या सामन्यात ११ धावांनी मात केली. सचिन बर्गे सामन्याचा मानकरी ठरला.
प्रहार इलेव्हनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, हा निर्णय संघाला महागात पडला. प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता इलेव्हनने सचिन बर्गेच्या १८ चेंडूंतील नाबाद ४५ धावांच्या जोरावर ६ षटकांत ४ बाद ७९ धावा केल्या. त्याला किरण बेरड (नाबाद २२) याची चांगली साथ लाभली. प्रहार इलेव्हन संघाने दडपणाखाली न येता जोरदार खेळ केला. आकाश काळे याने ११ चेंडूंत २७, परशुराम याने ९ चेंडूंत २१ धावा केल्या. मात्र, स्वप्नील देवकर (३ विकेट), विकास राठोड (२ विकेट) यांच्या गोलंदाजीसमोर संघाचा डाव कोसळला. संघाला ७ विकेट गमावून ६८ धावा करता आल्या. पराभूत संघाकडून अशोक गायकवाड याने २ विकेट घेतल्या.


दिलीप वर्माची तोडफोड फलंदाजी
अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध सेंट्रल स्टार रियालिटी यांच्यात शुक्रवारी सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना झाला. त्यात अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशनने ३६ धावांनी विजय मिळविला. विजयी संघाच्या दिलीप वर्मा याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
सेंट्रल स्टार रियालिटी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. परंतु, संघाचा हा निर्णय चुकीचा ठरला. दिलीप वर्माच्या याने तोडफोड फलंदाजी करत १८ चेंडूंत ५६ धावा केल्या. राहुल लोहार यानेही १० चेंडूंत १८ धावा केल्या.
सेंट्रल स्टार रियालिटीच्या अक्षय याने धारदार गोलंदाजी करत ४ तर सैफ खान याने २ विकेट घेतल्या. परंतु, प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला वेसण घालण्यात त्यांना अपयश आले. अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशनने निर्धारित ७ षटकांत ६ बाद १०० धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट्रल स्टार रियालिटी संघ ५ बाद ६४ धावा करु शकला.अमेर (१४), सुशील (१३), वसीम शेख (१३) यांनी थोडाफार प्रतिकार केला. विजयी संघाकडून अनिकेत रोडे याने २ विकेट घेतल्या.


मावळ इलेव्हनची सहज मात
मावळ इलेव्हन विरुद्ध मळा क्रिकेट क्लब यांच्यात सायंकाळी दुसरा सामना रंगला. त्यात मावळ इलेव्हनने ६ विकेट राखून विजय मिळविला. गोलंदाज उमेश कदम सामन्याचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी मावळ इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मळा क्रिकेट क्लब संघाने ७ षटकांत ६ बाद ५७ धावा करत मावळ इलेव्हनला ५८ धावांचे लक्ष्य दिले. अमित कोळेकर याने ११ चेंडूत २३ धावा केल्या. मावळ इलेव्हनने ४.४ षटकांतच ४ विकेटच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य केले. आकाश डी.याने १४ चेंडूंत नाबाद २५ तर स्वरांजल याने १७ धावा केल्या. विजयी संघाकडून दिनेश मालपोटे, जयेश यांनीही एकेक विकेट घेतल्या.

सेंट्रल स्टार रियालिटी विजयी
सेंट्रल स्टार रियालिटी विरुद्ध मळा क्रिकेट क्लब यापूर्वीच्या पराभूत संघांमध्ये साखळी फेरीचा तिसरा सामना झाला.
त्यामध्ये सेंटर स्टार रियालिटी संघाने ८ विकेट राखून विजय मिळविला. गोलंदाज सैफ खान सामनावीर ठरला.
सेंट्रल स्टार रियालिटीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, मळा क्रिकेट क्लबला त्याचा फायदा उचलता आला नाही. संघाला ६ षटकांत ७ बाद ३४ धावाच करता आल्या. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट्रल स्टार रियालिटी संघाने हे लक्ष्य २.३ षटकांत २ विकेटच्या बदल्यात सहज पूर्ण केले. अमोल याने ७ चेंडूंत १७ धावा केल्या. पराभूत संघाकडून महेश भोरे, अभिषेक यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. तर विजयी संघाच्या सैफ खान आणि शिवाजी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

अमरभाऊ काटे स्पोर्टसची आगेकूच
मावळ इलेव्हन विरुद्ध अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यात शुक्रवारी दहावा सामना झाला. त्यामध्ये
अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनने ७ विकेट राखून सहज विजय मिळविला. अनुराग मोहिते सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारले. आकाश डी. याने १५ चेंडूंत नाबाद २८ तर सुमीत पवार याने १६ चेंडूंत २० धावा केल्या. त्याच्या जोरावर मावळ इलेव्हनने ६ षटकांत ३ बाद ५८ धावा केल्या. हे आव्हान अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशनने ४.५ षटकांत ३ विकेट गमावत पूर्ण केले. विजयी संघाच्या अनुराग मोहिते याने ९ चेंडूंत नाबाद २९ तर शुभम शेळके याने २ चेंडूंत नाबाद १२ धावा केल्या.

मावळ इलेव्हनचे पुन्हा यश
सेंट्रल स्टार रियालिटी संघाला मावळ इलेव्हनने ६ विकेट राखून पराभवाचा धक्का दिला. शुभम काळोखे याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.
सेंट्रल स्टार रियालिटी संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ४ बाद ४८ धावा केल्या. विजयी संघाकडून मनोज दाभाडे, सुमीत पवार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मावळ इलेव्हनच्या शुभम काळोखे याने ८ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. आकाश डी.याने १८ धावा केल्या. पराभूत संघाकडून सामी खान याने २ विकेट घेतल्या.

अमरभाऊ काटे स्पोर्टसचा विजय
मावळ इलेव्हन विरुद्ध खेळताना अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशनने ३ विकेट राखून विजय मिळविला. राहुल लोहार सामन्याचा मानकरी ठरला.
मावळ इलेव्हन संघाने ६ षटकांत ४ बाद ५५ धावा केल्या. त्यात स्वरांजल जी.याच्या १७ चेंडूंतील २७ धावांचे मोलाचे योगदान राहिले. शुभम काळोखे यानेही ११ धावा केल्या. परंतु, प्रतिस्पर्धी संघासमोर खडतर आव्हान उभे करता आले नाही. अमरभाऊ काटे स्पोर्टस संघाने ५ षटकांत ७ बाद ५८ धावा केल्या. दिलीप वर्मा (१७), राहुल लोहार (१६), अमित तांबे (१२) यांनी संघाच्या विजयाला हातभार लावला. अमित तांबे, अनिकेत रोडे, रोहन खरात यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. पराभूत संघाकडून जयेश याने ३, मनोज दाभाडे याने २ विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT